एजाजहुसेन मुजावर
सोलापूर जिल्ह्य़ाला ‘ज्वारीचे कोठार’ म्हणून ओळखले जाते. या जिल्ह्य़ातील मंगळवेढा तर ज्वारीसाठी देशात प्रसिद्ध आहे. अलीकडे फळबाग योजनेंतर्गत सोलापुरात फळबाग लागवडीतही क्रांती झाली असून उजनी धरणामुळे उसाचे क्षेत्र उच्चांकी स्वरूपात वाढले असले, तरी मूळ ज्वारीचे कोठार म्हणून सोलापूरने जपलेली ओळख अद्यापि टिकविली आहे. मंगळवेढय़ातील ज्वारीला तर ‘जीआय’ मानांकन मिळाले आहे. मात्र यंदा दुष्काळाचा मोठा फटका बसल्यामुळे ज्वारीचे उत्पादन प्रचंड घडले आहे. त्यामुळे प्राचीन परंपरा लाभलेल्या या ‘ज्वारीच्या कोठारा’लाच आता शेजारच्या कर्नाटकासह मराठवाडा व विदर्भातून ज्वारी आयात करण्याची वेळ आली आहे.
यंदा संपूर्ण जिल्ह्य़ात पडलेल्या तीव्र दुष्काळामुळे खरीप व रब्बी हंगामाला प्रचंड मोठा फटका बसला आहे. त्यात ज्वारीचे उत्पादन कमालीचे घटले आहे. गतवर्षी जिल्ह्य़ात तीन लाख २१ हजार ९१६ हेक्टर क्षेत्रात ज्वारीचे उत्पादन घेण्यात आले होते. हेक्टरी सहा क्विंटलप्रमाणे सुमारे २० लाख क्विंटल ज्वारीचे उत्पादन घेण्यात आले होते. मागील तीन वर्षांतील पाऊसमान विचारात घेता ज्वारीचे उत्पादन चांगल्याप्रकारे झाले होते. परंतु यंदा दुष्काळामुळे ज्वारी उत्पादनात प्रचंड घट झाली आहे.
यंदा जिल्ह्य़ात जेमतेम ९७ हजार ८०० हेक्टर क्षेत्रातच ज्वारीच्या पेरण्या होऊ शकल्या. प्रत्यक्षात उत्पादन आणखी कमीच म्हणजे हेक्टरी चार ते पाच क्विंटल एवढेच उत्पादन मिळाले आहे. ज्वारीच्या कोठारात, मंगळवेढय़ात तर केवळ ८३०२ हेक्टर क्षेत्रातच ज्वारीचा पेरा झाला होता. करमाळ्यात त्यापेक्षा जास्त म्हणजे दहा हजार हेक्टर क्षेत्रात ज्वारीचे उत्पादन घेण्यात आले आहे.
स्वत:चा बैल बारदाना सांभाळण्यासाठी, मुक्या जनावरांना चारा उपलब्ध होण्यासाठी ज्वारी उत्पादनाकडे शेतक ऱ्यांचा कल असतो. सद्य:स्थितीत दुष्काळामुळे ज्वारीचे जे काही थोडेफार उत्पादन हाती लागले आहे, ते बाजारात विकण्यापेक्षा स्वत:च्या कुटुंबीयांपुरते खाण्यासाठी साठवणुकीला शेतक ऱ्यांची पसंती असल्याचे दिसून येते. त्यामुळे सध्या शेती बाजारात आयात होणारी ज्वारी ही स्थानिक नाही तर ती शेजारच्या कर्नाटकासह मराठवाडा व विदर्भातून आयात होत असल्याचे पाहावयास मिळते. सध्याच्या दुष्काळामुळे ज्वारीचे उत्पादनच लक्षणीय घटल्यामुळे बाजारात ज्वारीचे दर देखील थेट चाळिशी पार करत आहेत. दगडी ज्वारीचा किरकोळ दर प्रतिकिलो ४० रुपये इतका आहे. त्यात आगामी काही दिवसांत आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे.
दर वधारले
सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून ज्वारीचा ठोक दर प्रतिक्विंटल किमान २५०० रुपये तर कमाल दर ३१०० रुपये आणि स्थिर दर २९६० रुपये इतका वधारला आहे. यात मालदांडी ज्वारी मिळणे दुर्लभ असल्याने त्याचा दर देखील तेवढाच जास्त आहे. यापूर्वी तीन वर्षांतील ज्वारीचा दर १४०० रुपये ते १७०० रुपये प्रतिक्विंटल होता. यापूर्वी सोलापूरच्या शेती बाजारात ज्वारी कोठूनही सहसा आयात होत नव्हती. यंदा दुष्काळामुळे स्थानिक उत्पादित ज्वारीच उपलब्ध नसल्याने प्रथमच शेजारच्या कर्नाटक व आंध्र प्रदेशातून तसेच मराठवाडा व विदर्भातून ज्वारी आयात होत आहे. विदर्भ-मराठवाडय़ातून आयात होणारी ‘दुरी’ जातीची (सीएच ५ व सीएच ९) संकरीत ज्वारी आकाराने बारीक परंतु पांढरीशुभ्र आहे. या ज्वारीचा दरही तुलनेत कमी म्हणजे १८५० रुपये ते २५०० रुपये आहे. प्रामुख्याने खाणावळ व हॉटेल व्यावसायिक ही ज्वारी खरेदी करतात. आंध्र प्रदेशातील नंद्याळ भागातून महिंद्रा जातीची संकरीत ज्वारी आयात होत असून त्यास २३७५ रुपये ते २५०० रुपये दर मिळत आहे. सोलापुरात सध्या कर्नाटक, आंध्र व इतर भागातून दररोज शंभर ते दीडशे टन ज्वारी आयात होत आहे.