साताऱ्यात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे खासगी सचिव बाबासाहेब शिंदे यांच्या वाहनातून ५० हजार रुपयांची चोरी झाली. याशिवाय काही महत्वाची कागदपत्रे देखील चोरण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ते फलटणमध्ये लग्न सोहळ्यासाठी आलेले असताना हा प्रकार घडला. याबाबत बाबासाहेब शिंदे यांनी फलटण शहर पोलीस ठाणे येथे तक्रार नोंदवली आहे. पोलीस गुन्हेगारांचा शोध घेत आहेत. दरम्यान गृहराज्यमंत्र्यांच्या सातारा जिल्ह्यात गृहमंत्र्यांच्या सचिवांना चोरांनी झटका दिल्याची चर्चा सध्या फलटण तालुक्यात रंगली आहे.

नेमकं काय घडलं?

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे खासगी सचिव बाबासाहेब शिंदे हे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील धुळदेव येथे एका लग्न सोहळ्यासाठी आले होते. मात्र, लग्न सोहळ्यातून परत गाडीकडे आले असता त्यांच्या वाहनाची काच फोडल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावेळी वाहनातील ५० हजार रुपयांची रोख रक्कम आणि महत्वाची कागदपत्रे चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर शिंदे यांनी पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित प्रकाराची तक्रार दिली.

हेही वाचा : आजकाल तालुका पातळीपर्यंत मोठ्याप्रमाणात ड्रग्जचं प्रमाण वाढलय ही वस्तूस्थिती – वळसे पाटील

“गृहराज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात खुद्द गृहमंत्र्यांच्याच वाहनातून चोरीची जोरदार चर्चा”

दरम्यान गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याच जिल्ह्यात खुद्द गृहमंत्र्यांच्याच वाहनाची काच फोडून चोरीची घटना घडल्यामुळे सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. याबाबत शिंदे यांनी फलटण शहर पोलीस ठाणे येथे तक्रार नोंदविली आहे. अधिक तपास फलटण पोलीस करत आहेत.

Story img Loader