साईभक्तांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. १ मे रोजी कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन आहे. या दिवशी सुट्टी असल्याने तुम्ही शिर्डीच्या साई मंदिरात जाणार असाल तर थांबा. कारण, १ मे पासून शिर्डीत बेमुदत बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे दर्शनासाठी जाणाऱ्यांना नाहक त्रास होऊ शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिर्डीच्या साई मंदिरात आता सुरक्षेसाठी सीआयएसएफची सुरक्षा पुरवण्यात येणार आहे. या सुरक्षेविरोधात सर्वपक्षीयांसह ग्रामस्थांनी एल्गार पुकारला आहे. ही सुरक्षा आल्यास ग्रामस्थांना त्रास होऊ शकतो, याकरता सीआयएसएफ सुरक्षेविरोधात ग्रामस्थांनी बेमुदत बंदची हाक दिली आहे.

सध्या शिर्डीच्या साई मंदिरात संस्थानचे स्वतःचे सुरक्षा रक्षक आणि महाराष्ट्र पोलिसांचे सुरक्षा रक्षक तैनात आहेत. त्यातच, आता सीआयएसएफची सुरक्षा येणार आहे. या सुरक्षेमुळे ग्रामस्थांना त्रास होऊ शकतो, असं म्हटलं जात आहे. त्यामुळे बुधवारी ग्रामस्थांनी सर्व पक्षीयांसह बैठक घेतली. या बैठकीत बेमुदत बंदची हाक देण्यात आली आहे. बंद दरम्यान साई मंदिर, दर्शन व्यवस्था, साई संस्थानची निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था सुरू राहणार आहे. परंतु, शिर्डी बंद असल्याने वाहतुकीसह अन्य सुविधांपासून भक्तांना वंचित राहावं लागू शकते. यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागू शकतो.

दरम्यान, नुकतीच रामनवमी झाली. यानिमित्ताने देशभरातील लाखो भाविकांनी शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतले. रामनवमीनंतर साई बाबांच्या दर्शनाकरता भक्तांचा ओघ वाढत असतो. सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी येथे प्रचंड गर्दी होत असते. आता विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्या असून १ मे रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने अनेकजण या दिवशी शिर्डीत येण्याचे नियोजन आखत असतात. त्यामुळे यादिवशी शिर्डीत जाण्याऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो.