Imtiaz Jaleel : महायुतीच्या सरकारने शनिवारी (१८ जानेवारी) पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. यामध्ये बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील राजकारण चांगलंच तापलेलं आहे. संतोष देशमुख यांच्या हेत्येच्या घटनेनंतर आणि वाल्मिक कराड खंडणीच्या प्रकरणानंतर मंत्री धनंजय मुंडे यांना बीडचं पालकमंत्री पद देण्यात येऊ नये, अशी मागणी बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांनी केली होती. यावरून आरोप-प्रत्यारोपाने बीडचं राजकारण ढवळून निघालं. यानंतर अखेर बीडचं पालकमंत्री पद अजित पवार यांच्याकडे देण्यात आलं. मात्र, यावरून आता माजी खासदार इम्तियाज जलील यांनी हल्लाबोल केला आहे. “अजित पवार हे फक्त कागदावरच पालकमंत्री असतील आणि कोणीतरी दुसरं कार्य बजावेल”, असा आरोप इम्तियाज जलील यांनी केला आहे.
इम्तियाज जलील काय म्हणाले?
“उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी वर्णी लागली, ही एक राजकीय खेळी आहे. अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचं देखील पालकमंत्री पद आहे. खरं तर पुणे एवढं मोठं शहर आहे त्यामुळे पुण्याचं पालकत्व सांभाळणं म्हणजे एवढं सोप नाही. मात्र, असं असतानाही पुणे जिल्ह्याबरोबर अजित पवार यांनी बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद स्वीकारलं. त्यामुळे अजित पवार हे फक्त कागदावरच पालकमंत्री असतील आणि कोणीतरी दुसरं कार्य बजावेल. हे सर्व लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचं काम करत आहेत”, अशी टीका इम्तियाज जलील यांनी केली आहे.
“बीड जिल्ह्यात सर्वात जास्त क्राईमच्या घटना घडत असल्याचं दिसून येत आहे. त्या ठिकाणी कशा पद्धतीने गुन्हेगारांच्या टोळ्या आहेत, वाळू माफिया आहेत. हे सर्वांना माहिती आहे. मात्र, प्रश्न असा आहे की हे महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना का माहिती नसतं? पोलिसांना का काही माहिती नसतं? प्रशासनाला काही माहिती नसतं. महाराष्ट्रात सध्या जे काही घडतंय त्याला सरकारचं संरक्षण आहे का? असा प्रश्न पडतो”, असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.
‘सरकार तपास गांभीर्याने घेत नाही’
“संतोष देशमुख यांच्या हेत्येच्या घटनेचा तपास सरकार गांभीर्याने घेतंय असं वाटत नाही. कारण जे त्या घटनेशी संबंधित लोक आहेत ते सरकारशी जोडले गेलेले लोक आहेत. आता लोक एका वाल्मिक कराडला टार्गेट करत आहेत. पण माझं असं म्हणणं आहे, महाराष्ट्रात असे अनेक वाल्मिक कराड तयार करण्यात आलेले आहेत. ज्यांना सरकारचं संरक्षण आहे. ज्यांना पैसा पुरवण्यात येत आहे. कारण एका माणूस त्याला पोलिसांची भिती नसते. प्रशासनाची भिती नसते. न्यायप्रणालीला मानत नाही. मग त्याला कोणाचं संरक्षण आहे?”, असा सवाल इम्तियाज जलील यांनी केला.