विधानपरिषदेसाठी संधी मिळेल असा अंदाज बांधला जात असताना माजी मंत्री तथा भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना ऐनवेळी डावलण्यात आले. विधानपरिषदेसाठी पंकजा यांना संधी न मिळाल्यामुळे त्यांचे समर्थक प्रचंड नाराज आहेत. असे असतानाच आता एमआयएम पक्षाचे नेते तथा औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी मोठे विधान केले आहे. पंकजा मुंडे यांनी भाजपाला रामराम ठोकून नवा पक्ष स्थापन करावा. त्यांनी नव्या पक्षाची स्थापना केली तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होईल, असा सल्ला जलील यांनी पंकजा मुंडे यांना दिला आहे.

हेही वाचा >>>> नागपुरातील पाणी प्रश्नावर गडकरींचा फडणवीस यांना घरचा अहेर

याबाबतचे वृत्त टीव्ही ९ मराठीने दिले आहे. या वृत्तानुसार “विधानपरिषद निवडणुकीसाठी तिकीट न दिल्यामुळे पंकजा मुंडे यांनी स्व:तचा पक्षा काढावा हा माझा सल्ला आहे. मला असं वाटतं की पंकजा मुंडे यांना भविष्य आहे. त्यांच्या नावापुढे गोपीनाथ मुंडे यांचं नाव आहे. गोपीनाथ मुंडे यांना माणणारा खूप मोठा वर्ग आहे. राज्याचे गृहमंत्री असताना त्यांनी खूप मोठं काम केलं आहे. हे काम कोणीही विसरलेलं नाही. मग इतकी लाचारी कशाला? विधानपरिषद दिली नाही तर फक्त नाराजी कशाला. त्यांनी दुसऱ्याच दिवशी पक्षाला रामराम ठोकून नव्या पक्षाची घोषणा करायची असती. त्या ओबीसीच्या नेत्या म्हणून उभ्या राहतील तेव्हा त्यांच्या मागे किती मोठी ताकद उभी राहील हे पाहायला मिळेल,” असे जलील म्हणाले.

हेही वाचा >>>> विरोधकांचा संयुक्त उमेदवार; राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी पवारांचा नकार, २१ जूनच्या बैठकीत नावावर शिक्कामोर्तब

तसेच पंकजा यांनी नव्या पक्षाची स्थापन केल्यास महाराष्ट्राच्या राजकारणात काय बदल होतील याबद्दलही जलील यांनी भाष्य केले आहे. “पंकजा यांच्या बहीण प्रीतम मुंडे खासदार आहेत. त्यांनाही मी याबाबत एक दोन वेळा सुचवलेलं आहे. मला त्यांना हे सुचवण्याचा अधीकार नाही. मात्र पूर्वीचा एक पत्रकार म्हणून मला असं वाटतं की त्यांनी असा मोठा निर्णय घेतला तर महाराष्ट्रात राजकीय भूकपं येईल आणि त्यानंतरच लोकांना मुंडे परिवाराची काय ताकद आहे हे समजू शकेल,” असे जलील म्हणाले आहेत.

हेही वाचा >>>> Agneepath Scheme Protest: मोदी सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेविरोधात बिहारमध्ये आंदोलन; विद्यार्थ्यांनी ट्रेनच्या डब्याला लावली आग; रस्ते वाहतूकही अडवली

तसेच पंकजा यांनी नवा पक्ष स्थापन केला तर एमआयएम त्यांना मदत करेल का असा प्रश्न जलील यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना, “एमआयएम किंवा मुस्लीम समाजाला कोणासोबत जायचं अशी वेळ आली, तर आमच्यासाठी दलित किंवा ओबीसी समाज योग्य आहे. राजकीय समीकरण तयार होऊ शकतं. ओबीसी आणि मुस्लीम समाज एकत्र आले तर महाराष्ट्रात काय नाही होऊ शकत?” असे वक्तव्य जलील यांनी केले.

हेही वाचा >>>> तुम्ही मुस्लिमांना भारताचा भाग मानता का?, पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या फराह खानवर संतापले अशोक पंडित, म्हणाले…

दरम्यान, पंकजा यांना भाजपाने डावलल्यानंतर त्यांचे समर्थक प्रचंड नाराज आहेत. तर दुसरीकडे पंकजा मुंडे शिवसेनेत आल्या तर त्यांचं स्वागतच करु असं वक्तव्य शिवसेनेच्या नेत्यांनी केलं आहे. पंकजा यांना उमेदवारी न दिल्याने पाथर्डी येथील एका कट्टर मुंडे समर्थकाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. अशा घडामोडी घडत असताना पंकजा मुंडे पुढे कोणता राजकीय निर्णय घेणार असा प्रश्न विचारला जातोय.