छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा भागात काल रात्री दंगल झाली. यावेळी दंगलखोरांनी पोलिसांची वाहनं जाळली, सामान्य नागरिकांची वाहनं जाळली, अनेक वाहनांची तोडफोडही केली. पोलीस ठाण्यावर दगडफेक केली. यामुळे कालपासून किराडपुरात तणावाची परिस्थिती आहे. दरम्यान, या सर्व प्रकाराला खासदार इम्तियाज जलील कारणीभूत आहेत, असा आरोप भाजपा आमदार गिरीश महाजन यांनी केला आहे.
महाजन म्हणाले की, औरंगाबादमध्ये जे घडलं त्याला इम्तियाज जलील यांनी अलिकडेच केलेलं १५ दिवसांचं आंदोलन कारणीभूत आहे. त्यामुळेच तिथली परिस्थिती बिघडली आहे. जलील यांच्या आंदोलनादरम्यान अनेक आक्षेपार्ह वक्तव्ये केली गेली, त्यामुळे हा प्रकार घडला. दरम्यान, महाजन यांच्या टीकेला खासदार इम्तियाज जलील यांनी उत्तर दिलं आहे. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.
“मला वाटायचं गिरीश महाजनांना अक्कल आहे”
खासदार इम्तियाज जलील म्हणाले, मला आधी वाटायचं गिरीश महाजन उच्च शिक्षित आहेत. त्यांना थोडी अक्कल असेल, पण तसं नाहीये. मी १४ दिवस लोकशाही मार्गाने आंदोलन केलं. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आम्ही ठिय्या मांडून बसलो. कँडल मार्च काढला. एक मोठं आंदोलन विभागीय आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर केलं. एकूण तीन आंदोलनं केली तरी कुठेही कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
हे ही वाचा >> राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार? अजित पवार म्हणाले, “जयंत पाटलांना विचारेन, कुठल्या माहितीच्या आधारावर…”
जलील म्हणाले, आमच्या आंदोलनावेळी कुठेही हेट स्पीच (द्वेष मूलक वक्तव्य) ऐकायला मिळालं नाही. तरीसुद्धा माझ्यासह २९ जण आणि इतर १५०० अनोळखी लोकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.