Imtiaz Jaleel on Eknath Shinde & Kunal Kamra : प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक कवितेच्या माध्यमातून टीका केली होती. त्यानंतर शिवसेनेचे (शिंदे) कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. शिवसेना कार्यकर्त्यांनी ठाणे व मुंबईत अनेक ठिकाणी निदर्शने केली, कुणाल कामराचे पोस्टर्स जाळले. शिंदेंचे समर्थक एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी थेट मुंबईतील खार रोड येथील युनिकॉन्टिनेन्टल हॉटेलवर हल्ला केला. या हॉटेलमधील द हॅबिटॅट या स्टुडिओमध्ये कुणाल कामरा याचा कार्यक्रम झाला होता. शिंदे समर्थकांनी या स्टुडिओची तोडफोड केली आहे.

शिवसेना कार्यकर्त्यांनी स्टुडिओमधील खुर्च्या तोडल्या, बल्ब व इतर वीजेच्या उपकरणांची मोडतोड केली. तसेच तिथल्या मंचाची नासधूस केली. दरम्यान, या दोन्ही घटनांवर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार व एआयएमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी या घटनेवरून एकनाथ शिंदेंवर व शिवसेना कार्यकर्त्यांवर संताप व्यक्त केला आहे.

इम्तियाज जलील नेमकं काय म्हणाले?

इम्तियाज जलील यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “गेल्या वर्षी जेव्हा एका बोगस साधूने पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी केली होती, तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या साधूचे समर्थन केले होते आणि असेही म्हटले होते की कोणी त्याच्या केसालाही हात लावू शकणार नाही! आता स्वतःची थोडीशी थट्टा केल्यानंतर त्यांच्या पक्षाचे गुंड हिंसाचार करू लागले आहेत, ते वेडे झाले आहेत. मी कुणाल कामरा याचे पूर्ण समर्थन करतो.”

सराला बेट येथील गंगागिरी महाराज मठाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत कीर्तनामधून आक्षेपार्ह वत्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. याच घटनेचा संदर्भ देऊन इम्तियाज जलील यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगवला असावा, असं बोललं जात आहे.

तोडफोडप्रकरणी १२ जण अटकेत

दरम्यान, हॅबिटॅट स्टुडिओच्या तोडफोड प्रकरणी खार पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाच्या युवासेनेचे सरचिटणीस राहुल कनाल आणि वांद्रे विभागप्रमुख कुणाल सरमळकर यांना पहाटेच्या सुमारास ताब्यात घेतलं होतं. पाठोपाठ आणखी १८ जणांना जणांना ताब्यात घेतलं होतं. यापैकी राहुल कनालसह अनेकांना पोलिसांनी चौकशी करून सोडून दिलं होतं. पाठोपाठ, या तोडफोड प्रकरणात दुपारी १२ जणांना अटक केल्याचं वृत्त समोर आलं आहे. इंडियन एक्सप्रेसने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.