ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (AIMIM) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद शहराच्या नामकरणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात व अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. “बाळासाहेब थोरात म्हणाले आम्ही विरोध केला नाही. काय रे गोट्या, मग इतकंच प्रेम होतं तर २०१४ मध्ये मला सत्ता नको, या शहराचं नाव बदलायचं आहे असं का सांगितलं नाही,” असा सवाल जलील यांनी केला. ते मंगळवारी (१२ जुलै) औरंगाबादमध्ये नामांतर विरोधात भडकल गेट परिसरात काढलेल्या भव्य मूक मोर्चात बोलत होते. या मोर्चाचे रूपांतर हमखास मैदानातील सभेत झाले होते.
इम्तियाज जलील म्हणाले, “आत्ता मी केवळ एका पक्षाचं नाव घेत नाहीये, पण काँग्रेसवाले नेहमी असं म्हणायचे की आमच्या किमान समान कार्यक्रमात औरंगाबादच्या नामांतराचा विषय नाही. त्यामुळे असा निर्णय होणार नाही. मात्र, हा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात म्हणाले आम्ही विरोध केला नाही. काय रे गोट्या, मग इतकंच प्रेम होतं तर २०१४ मध्ये मला सत्ता नको, या शहराचं नाव बदलायचं आहे असं का सांगितलं नाही.”
“अशोक चव्हाणांचा समाचार घ्यायला मी नांदेडला देखील जाणार”
“नांदेडचे एक साहेब आहेत, अशोक चव्हाण. त्यांनी नीट ऐकावं, तुमचा समाचार घ्यायला मी नांदेडला देखील येणार आहे. त्यांनी केवळ या नामांतराला पाठिंबा दिला नाही, तर त्यांनी आपल्याला इतिहासच शिकवला. इतिहासात काय झालं हे कुणीही नष्ट करू शकत नाही. इतिहासात चांगलं झालं, वाईट झालं ते इतिहासाचा भाग आहे,” असं जलील यांनी नमूद केलं.
“तू मला ओळखत नाही रे राजा, असे किती आले आणि गेले”
इम्तियाज जलील पुढे म्हणाले, “सोशल मीडियावर काही तरुण माझ्यावर चुकीच्या कमेंट करत आहेत. ते मला जशास तसं उत्तर देऊ असं सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘अरे तू मला ओळखत नाही रे राजा’. तुझ्यासारखे किती आले आणि किती गेले. चुकीच्या लोकांमध्ये अडकू नका. हे शहर आपल्या सर्वांना मिळून पुढे न्यायचं आहे.”
हेही वाचा :
“जे लोक या सभेला आलेले नाहीत, त्यांची वाट लागणार आहे”
“आजच्या या सभेला जे आलेले नाहीत त्यांना देखील लक्षात ठेवलं जाईल. तुमच्यासाठी तुमचं राजकारण महत्त्वाचं असेल, मात्र आम्ही अशा राजकारणाला लाथ मारतो. जेव्हा आपल्या शहराच्या अस्तित्वाचा, ओळखीचा प्रश्न येतो तेव्हा आपण एक ताकद बनून उभे राहू. त्यामुळे जे लोक या सभेला आलेले नाहीत, त्यांची वाट लागणार आहे,” असा सूचक इशारा इम्तियाज जलील यांनी दिला.