मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या वेशीवर आलेल्या आंदोलकांना रोखण्यासाठी राज्य सरकारने घाईघाईत कुणबी नोंद असलेल्यांच्या सग्यासोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबत अधिसूचनेचा मसुदा प्रसिद्ध केला. तसेच मराठा आंदोलकांच्या इतर मागण्यादेखील मान्य केल्या आहेत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील आंदोलन मागे घेत वाशीतूनच (नवी मुंबई) माघारी फिरले. मनोज जरांगे यांच्या गेल्या अनेक वर्षांपासूनच्या या आंदोलनाला शनिवारी (२७ जानेवारी) मोठं यश मिळालं. दरम्यान, हे आंदोलन अनेकांसाठी आदर्श असल्याचं म्हटलं जात आहे. छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी मुस्लीम समुदायाला या आंदोलनातून शिकण्याचा सल्ला दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इम्तियाज जलील म्हणाले, मनोज जरांगे हे खूप प्रामाणिक आणि निष्ठावंत आहेत. एका छोट्याशा गावातील एक सामान्य माणूस आंदोलन करू लागला आणि त्याच्यामागे लाखोंच्या संख्येने लोक जेव्हा उभे राहतात तेव्हा एक संदेश जातो की आता लोकांचा राजकीय नेत्यांवरचा, पुढाऱ्यांवरचा विश्वास उडाला आहे. मनोज जरांगे पाटील हा एक सामान्य माणूस आहे. तरीदेखील त्याच्यामागे इतके लोक का उभे राहिले? त्याचा प्रामाणिकपणा, त्याची निष्ठा हीच या लोकांना एकत्र आणण्याचं प्रमुख कारण आहे. मला माझ्या समाजासाठी काहीतरी करायचं आहे, ही मनोज जरांगेंची भावनाच लोकांना त्यांच्याकडे आकर्षित करते. आज त्यांना मोठं यश मिळालं आहे. त्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करतो.

मनोज जरांगेंच्या आंदोलनाचं उदाहरण देत खासदार इम्तियाज जलील यांनी मुस्लीम समुदायाला आरक्षणासाठी अशा प्रकारचं आंदोलन करण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, मनोज जरांगेंच्या आंदोलनाकडे पाहिलं की, मला एका गोष्टीची खंत वाटते की, आमचे लोक (मुस्लीम समुदाय) असे एकत्र येत नाहीत. मला वाटतं की, आमच्या समाजातील लोकांनीही त्यांच्यातले राजकीय मतभेद विसरून एकत्र यावं. आपसातले वाद मिटवून एकत्र आलो तर आमच्या अनेक मागण्या आम्ही पूर्ण करू शकतो. सर्वच समाजांनी मनोज जरांगेंकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. प्रामुख्याने मुस्लीम समाजाने त्यांच्याकडून धडा घ्यायला हवा.

हे ही वाचा >> आश्वासन न पाळल्यास पुन्हा आंदोलन; मनोज जरांगे यांचा इशारा

इम्तियाज जलील म्हणाले, मराठे आमचे मोठे भाऊ आहेत. आमचा त्यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा आहे. आज तुमच्या लढाईत आम्ही सहभागी आहोत. यात आमची एवढीच अपेक्षा आहे की, आम्ही आमच्या आरक्षणाची लढाई लढू तेव्हा मराठेदेखील आमची साथ देतील. मनोज जरांगे यांच्यासारखा एखादा नेता आमच्यातून उभा राहिला तर मी त्याच्याबरोबर असेन.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Imtiyaz jaleel says someone like manoj jarange stands for muslim reservation i will support him asc