राज्यात सध्या सत्ताधारी शिवसेना व विरोधी पक्ष भाजपामध्ये विविध मुद्द्यांवरून वातावरण चांगलंच तापलेलं आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मात्र शिवसेना सत्तेत येण्या अगोदर भाजपासोबत अनेक वर्षांपासून युतीत राहिलेली आहे. असे असताना विधानसभा निवडणुकानंतर निर्माण झालेल्या सत्ता संघर्षात अखेर ही अनेक वर्षांपासूनची युती तुटली. यानंतर शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सोबतीने राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करून, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केलं. तेव्हापासून भाजपा व शिवसेनेतील वाद शमलेला नाही. तर, महाविकासआघाडी सरकार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने टीका करणाऱ्या, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना एक मोठं विधान केलं आहे.

“२०१९ मध्ये शिवसेना-भाजपामध्ये काहींनी जाणीवपूर्वक दुरावा निर्माण केला. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रे दरम्यानही हा दुरावा निर्माण करण्याचा पुन्हा प्रयत्न झाला. परंतु खुर्चीचा मोह असणाऱ्या उद्धव ठाकरे यांना ही गोष्ट कळत नसावी!” असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

संजय राऊत व्यतिरिक्त कुणी बोलताना दिसतयं का? –

तसेच, “मंदिरांचा विषय असाच आहे मंदिरं उघडणं हे काँग्रेस, राष्ट्रवादीला चालणार नाही. मग त्यांना चालणार नाही का? मग खुर्चीसाठी मी देखील उघडणार नाही. दुसरं काही कारणच नाही मंदिरं न उघडण्याचं. त्यामुळे असं खुर्चीवर प्रेम असणारे जे उद्धव ठाकरे आहेत, ते स्वत:च्या पक्षाचं काय नुकसान झालं… मला एकाच प्रश्नाचं फक्त उत्तर द्या, की संजय राऊत व्यतिरिक्त कुणी बोलताना दिसतयं का? आमचे परममित्र दिवाकर रावते कुठे गेले? आमचे अतिपरममित्र खूप दोस्ती आहे आमची असे रामदास कदम कुठे गेले? अनिल देसाई, सुभाष देसाई, रवि वायकर कुठे गेले? कुठे गेलेत सगळेजण? एकटं संजय राऊत बोलत आहेत.” असा यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सवाल केला.

खेडला अख्खी पंचायत समिती पळवून नेली आणि ते काही करू शकले नाहीत –

याचबरोबर ते पुढे म्हणाले की, “मग एकतर ते बोलले तर ते खरं बोलतील, म्हणून त्यांना बोलू देत नाहीत किंवा ते नाराज असतील. की काय याला बोलायचं बोलू दे, खूप नुकसान करतोय. हे जे नुकसान सुरू आहे की स्वतःच्या पक्षातील कार्यकर्ते खेचून नेताय, खेडला अख्खी पंचायत समिती पळवून नेली आणि काही ते करून शकले नाहीत. संजय राऊत आले त्यांच्या स्टाईलने..त्यांच्या स्टाईलचं फार मला कौतुक वाटतं, मोठ्या स्टाईलने आले आणि होऊ देणार नाही… आणि झालं. शेवटी राष्ट्रवादीचा पंचायत समितीचा सभापती झाला.” असं यावेळी चंद्रकांत पाटीला यांनी बोलून दाखवलं.