राज ठाकरेंचे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याशी चांगले संबंध आहेत मात्र त्यांची आमच्या युतीला गरज नसल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले आहे.तसेच मला एकट्याला मंत्री करून उपयोग नाही.महामंळात आरपीआयला पद मिळालं पाहिजे असंही रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात सत्ता बदल झाल्यापासून राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस हे अनेकदा एकाच मंचावर दिसले आहेत. या तिघांचेही परस्पर संबंध खूप चांगले आहेत. महापालिका निवडणुका तिन्ही पक्ष सोबत लढणार असल्याचीही चर्चा आहे. अशात आता रामदास आठवलेंच्या वक्तव्यामुळे आता सगळ्यांच्या भुवया उंचवाल्या आहेत.
मंत्रिमंडळाचा विस्तार केला जावा आणि आरआपीआयला मंत्रिपद मिळावं अशीहीही मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. रामदास आठवले पुढे असंही म्हणाले की महाराष्ट्रात एकट्याच्या बळावर यश मिळवणं कठीण आहे. लोकसभेत आम्हाला तीन जागा मिळाव्यात आणि विधानसभेत आम्हाला काही जागा दिल्या जाव्यात अशीही मागणी आठवलेंनी केली आहे. 27 मे ला ऑल इंडियाची मिटिंग शिर्डीत होणार आहे त्याबाबत आम्हाला काही चिंता नाही असंही आठवले यांनी सांगितलं.
एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह असलेला धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव दिलं आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निकालही त्यांच्याच बाजूने लागेल असा विश्वासही रामदास आठवलेंनी व्यक्त केला आहे. शिवसेनेत जी उभी फूट पडली त्या फुटीला उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे दोन्ही नेते जबाबदार आहेत. त्यांनी आमची साथ सोडली आणि काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेले त्यामुळे ही सगळी परिस्थिती निर्माण झाली असंही आठवले यांनी म्हटलं आहे.
आमची युती नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली २०२४ च्या लोकसभा निवडणुका जिंकणार आहोत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने काही फरक पडणार नाही असंही रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर मी एकदा शिर्डीत हरलो पण शिर्डीचा विकास करण्यासाठी मी पुन्हा उभा राहिन. शिर्डीची जनता माझ्यावर पूर्ण विश्वास दाखवेल असंही रामदास आठवलेंनी म्हटलं आहे.