महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत तर, अजित पवारांनी राष्ट्रवादी फूट पाडून महाराष्ट्रातील राजकारण ढवळून काढलं. वर्षभराच्या अंतराने झालेल्या फूटीचं राजकारण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दरबारी प्रलंबित आहे. त्यांच्याकडून लवकरच याबाबत मॅरेथॉन सुनावणी केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, यावरून ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
संजय राऊत म्हणाले, “राहुल नार्वेकरांनी निकाल लावायला एक वर्ष घेतलं आहे. ४० आमदारांचा निकाल लावायला ४० तास पुरेसे आहेत. घटनेतून निकाल लावायचं काम करायचं आहे. चिन्हावर निवडून आले आणि फूट पाडून बाहेर गेलेत. १० शेड्युल्डनुसार निर्णय द्यायचा आहे.घटनेतील १० व्या शेड्युलनुसार राहुल नार्वेकरांना निर्णय द्यायचा आहे. त्यांना १० वी घटना माहित नसेल तर त्यांच्यासाठी आम्ही तज्ज्ञ पाठवू. ४० तासांत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांचा निकाल लागू शकतो, पण त्यांना लावायचा नाहीय. हे घटनेची पायमल्ली करत आहेत. फालतू राजकारण करून महाराष्ट्राला अस्थिर करत आहेत”, असा आरोपही त्यांनी केला.
ही ऐतिहासिक घटना
“उद्धव ठाकरे उद्या जळगावात पोहोचणार आहेत. त्यात टीका टिप्पणी करायचं काय कारण? जळगाव महानगरपालिकेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण ठेवले आहे. भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे उपस्थित होते. पुतळ्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला येईन असे उद्धव ठाकरे म्हणाले होते, ही वचनपूर्ती आहे. छत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण करणे ही ऐतिहासिक घटना आहे”, असेही संजय राऊत यांनी म्हणाले.
हेही वाचा >> “मनोज जरांगे फाटका माणूस”, संजय राऊतांचं वक्तव्य; म्हणाले, “मी त्यांना पाहिलं तेव्हा…”
सर्व विधिनिषेध धुळीस मिळवले
“तसंच, जे विरोध करतात ते उद्धव ठाकरेंना विरोध करत नसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला त्यांच्या अस्तित्वाला विरोध करत आहेत. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. राजकारण कोठे करावं आणि का करावं याचे विधिनिषेध धुळीस मिळवले. तुम्हीही येथे या तुम्हाला कोणी अडवला आहे? पण उद्या सभा होणारच”, असा निर्धारही राऊतांनी बोलून दाखवला.