अहिल्यानगर : मूग व मूगडाळीच्या खरेदी-विक्री व्यवहारात ३८.६९ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून जळगाव येथील दोघांविरुद्ध अहिल्यानगरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात व्यापारी प्रशांत प्रकाश गांधी (३९, रा. प्लॉट क्रमांक १८, पूनममोतीनगर, मार्केट यार्ड, अहिल्यानगर) यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केली होती. त्याची चौकशी केल्यानंतर शहरातील कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी फिर्यादीनुसार ममता संजय जैन व संजय निमित्त जैन (दोघे रा. शांतिनाथ इम्पेक्स, एमआयडीसी, जळगाव) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही फसवणूक ७ सप्टेंबर ते २९ डिसेंबर २०२४ या कालावधीत घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
प्रशांत गांधी हे मूग व मूगडाळीचे व्यापारी आहेत. त्यांनी जैन यांना ६० लाख ९९ हजार १०९ रुपये किमतीचे मूग व मूगडाळीची विक्री केली. त्यापोटी जैन यांनी धान्य मालाचे व गाडी भाड्याचे २२ लाख २९ हजार १७० रुपये प्रशांत गांधी यांना दिले. मात्र उर्वरित ३८ लाख ६९ हजार ९३९ रुपयांची रक्कम न देता विश्वासघात करून फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
प्रशांत गांधी यांनी जैन यांना दूरध्वनी करून मालाच्या उर्वरित रकमेची मागणी केली. मात्र जैन यांनी, कशाचे पैसे, मी माल घेतलेला नाही, परत पैशाचा विषय काढला तर अहिल्यानगरमध्ये येऊन तुझे हातपाय काढील, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. अधिक तपास कोतवाली पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे करत आहेत. यापूर्वी अहिल्यानगर शहरातील कांदा व्यापाऱ्यांची अशाच प्रकारे पश्चिम बंगाल व केरळमधील व्यापाऱ्यांनी फसवणूक केल्याचे गुन्हे कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल आहेत. काही गुन्हे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी वर्ग करण्यात आले आहेत.