अहिल्यानगरः कर्जत नगरपंचायतमधील आमदार रोहित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) सत्तेला भाजपचे विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी सुरुंग लावल्यानंतर आता पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी श्रीरामपूरमध्ये काँग्रेसला मोठे भागदाड पाडत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना आणखी एक हादरा दिला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे लक्ष ठेवत भाजपने अहिल्यानगर जिल्ह्यात अधिक आक्रमकपणे वाटचाल सुरू केलेली दिसते. लोकसभेच्या जिल्ह्यातील दोन्ही जागा महायुतीने गमावल्यानंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीने १२ पैकी १० जागांवर यश संपादन केले. हेच चित्र सन २०१९ मध्ये उलटे होते. तोच भाजप आता अधिक आक्रमकपणे फोडाफोडी करू लागला आहे.
सुरुवातीला लाल बावटा नंतर काँग्रेस व राष्ट्रवादी अशी वाटचाल करणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यावर आता महायुतीने प्राबल्य निर्माण केले आहे. त्यातही विधानसभेतील यशानंतर भाजप जिल्ह्यात अधिक आक्रमक झालेला जाणवतो. विधानसभा निवडणुकीपूर्वी जिल्ह्यात अस्तित्वहीन असलेल्या शिवसेनेच्या शिंदे गटाने भाजपच्या सहकार्याने दोन जागा जिंकल्या. त्यानंतर शिंदे गटाने अहिल्यानगर शहरातील ठाकरे गटाला हादरे देण्यास सुरुवात करत, ठाकरे गटाच्या अस्तित्वालाच धक्का दिला.
भाजप व शिंदे सेना दोन्ही पक्ष जिल्ह्यात आक्रमक आहेत, तुलनेत भाजप अधिक. कारण जिल्ह्यातील सत्तापदे भाजपकडे आहेत. पालकमंत्री पद राधाकृष्ण विखे तर विधान परिषदेचे सभापती पद राम शिंदे यांच्याकडे. जिल्हा बँकेचे अध्यक्षपदही भाजपकडेच आहे. त्यामुळे भाजप अधिक जोमाने फोडाफोडी करताना दिसतो. राज्यातील सत्ताधारी महायुतीमधील राष्ट्रवादी व शिंदे सेनेकडे जिल्ह्यात सत्तापदे नाहीत. आहेत ती केवळ भाजपकडे. भाजप इतकेच संख्याबळ प्राप्त करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनेही आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लक्षात घेत जिल्ह्यात हालचाल करण्यास सुरुवात केली आहे. त्यातून जिल्हा परिषदेच्या काही माजी पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश घडवला जाईल.
जिल्ह्यात एका महापालिकेसह १५ नगरपालिका-नगरपंचायती आहेत. पैकी केवळ अकोले, कर्जत व पारनेर या तीन संस्था जीवंत म्हणजे तेथील नगरसेवकांचा कार्यकाळ संपलेला नाही. इतर सर्व ठिकाणी कार्यकाळ संपून तीन-चार वर्षांचा कालावधी लोटला आहे. अस्तित्वातील कर्जत नगरपंचायतीमधील शरद पवार गटाच्या नगराध्यक्षाविरुद्ध राम शिंदे यांच्या पुढाकारातून अविश्वास ठराव दाखल झाला आहे. आमदार रोहित पवार समर्थक आठ नगरसेवक त्यांनी आपल्या बाजूला वळवले. तर श्रीरामपूरमधील काँग्रेसच्या १० माजी नगरसेवकांचा विखे यांच्या माध्यमातून भाजप प्रवेश घडला.
अस्तित्वातील तीन पालिकांपैकी कर्जत व पारनेर महायुतीकडे नाही, तेथे शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीची सत्ता आहे. राम शिंदे यांनी सत्तांतर घडवण्यासाठी खेळी खेळली, आता पुढचा क्रमांक पारनेरचा असू शकतो. तेथे शरद पवार गटाचे खासदार नीलेश लंके यांच्या समर्थकांची सत्ता आहे. विखे-लंके यांच्यातील वैमनस्य जगजाहीर आहे. तेथील आमदार काशिनाथ दाते अजित पवार गटाचे आहेत. विखे-दाते संबंध विलक्षण सौख्याचे आहेत. त्यामुळे महायुतीचे पुढील लक्ष पारनेर नगरपंचायत ठरू शकते.