अहिल्यानगर : प्रादेशिक परिवहन विभागास अहिल्यानगर जिल्ह्यातून सन २०२४-२५ या वर्षात ३८९ कोटी ४० लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे. त्यामध्ये आकर्षक क्रमांकांच्या विक्रीतून ११ कोटी ५३ लाख रुपये उत्पन्न मिळाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत विविध प्रकारच्या वाहनांच्या विक्रीत वाढ झालेली आहे. यामध्ये अहिल्यानगर व श्रीरामपूर अशा दोन्ही उपप्रादेशिक परिवहन विभागाचा समावेश आहे.
या महसुलात वाहन विक्री, आकर्षक क्रमांकाची विक्री, विविध प्रकारची दंडात्मक कारवाई अशा सर्व मार्गाने मिळालेल्या उत्पन्नाचा समावेश असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी दिली. जिल्ह्यात अहिल्यानगर उपप्रादेशिक परिवहन विभाग अंतर्गत अहिल्यानगर, पाथर्डी, शेवगाव, कर्जत, जामखेड, श्रीगोंदे व पारनेर तर श्रीरामपूर विभागात अकोले, संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता, राहुरी व नेवासे यांचा समावेश होतो. अहिल्यानगरला आता प्रादेशिक परिवहन अधिकारी पद निर्माण करण्यात आले आहे.
अहिल्यानगर उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यक्षेत गेल्या वर्षभरात विविध प्रकारच्या ६३ हजार ९४ वाहनांची तर श्रीरामपूर विभागाच्या कक्षेतून ५५ हजार ४८२ वाहने अशी जिल्ह्यात एकूण १ लाख १७ हजार ६७६ वाहनांची विक्री झाली आहे. सर्वाधिक वाहन विक्री अर्थातच मोटरसायकल, मोपेड यांच्या विक्रीची, एकूण ८७ हजार ८५७ संख्या आहे. त्याखालोखाल अर्थातच मोटरकारची १० हजार १६४ संख्येने विक्री झाली आहे.
जिल्ह्यात शेती व्यवसायात अधिक मोठ्या संख्येने लोक गुंतलेले असल्याने केवळ ट्रॅक्टर विक्रीची संख्या ९ हजार ३२५ आहे. बेरोजगार तरुण वाहतुकीच्या व्यवसायात उतरू लागल्याने तीन व चारचाकी डिलिव्हरी व्हॅन विक्रीच्या खपातही वाढ झाली आहे. त्याची ३ हजार ६३३ संख्येने विक्री झाली आहे. इतर वाहनांमध्ये ट्रेलर, लॉरी, ॲम्बुलन्स, सर्विस व्हेईकल्स, स्कूल बस, मिनीबस, स्टेज कॅरीजेस, टुरिस्ट टॅक्सी, स्टेशन वॅगन्स आदी वाहन विक्रीचा समावेश आहे.
पसंती क्रमांकासाठी ११.५३ कोटी
वाहन विक्रीत वाढ होऊ लागली तशी वाहनांना आपल्या पसंतीचा आकर्षक क्रमांक देण्याची चढाओढ निर्माण होऊ लागली आहे. गेल्या वर्षभरात अहिल्यानगर विभागातून ६५६९ जणांनी, आकर्षक क्रमांक मिळवण्यासाठी परिवहन विभागाकडे ७ कोटी १० लाख तर श्रीरामपूर विभागाकडे ४४३७ जणांनी पसंती क्रमांकासाठी ४ कोटी ४३ लाख रुपये असे एकूण ११ कोटी ५३ लाख रु. खर्च केले आहेत. मोटर सायकलसाठी ५ हजारापासून ते १ लाख व मोटर कारसाठी १० हजारापासून ते ५ लाखांपर्यंत रक्कम पसंती क्रमांकसाठी आकारली जाते. सन २०२३-२४ या वर्षात अहिल्यानगर विभागाला पसंती क्रमांकातून ५ कोटी ३६ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते.
इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत घट
इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीमध्ये मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत घट झाली आहे. सन २०२३-२४ मध्ये ४ हजार ७७९ दुचाकी, ३६९ तीनचाकी तर मोटर कार १३४ व बस ३ अशी एकूण ५ हजार २८५ इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली. सन २०२४-२५ मध्ये मात्र त्यामध्ये घट झाली आहे. दुचाकी १ हजार ६८९ वाहने, १०० तीनचाकी वाहने, ७० मोटरकार व ३ बस वाहनांची विक्री झाल्याचे परिवहन विभागाकडील आकडेवारी सांगते.