अहिल्यानगर : जिल्ह्यातून जाणाऱ्या विविध महामार्गांवर ४३ अपघातजन्य ठिकाणे (ब्लॅकस्पॉट) आढळली आहेत. या ठिकाणी गेल्या तीन वर्षात ४०६ अपघात झाले, त्यामध्ये २६८ जणांचा मृत्यू झाला. सन २०२१, २०२२ व २०२३ या वर्षातील ही आकडेवारी आहे.

सर्वाधिक अपघातजन्य ठिकाणे अहिल्यानगर-मनमाड रस्त्यावर आढळली आहेत. या अपघातजन्य ठिकाणांवर उपाययोजना सुचवण्यासाठी एका खाजगी संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत अपघातजन्य ठिकाणांवर तांत्रिक उपाय सुचवण्यासाठी ‘रेसिलियंट इंडिया’ या खाजगी संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच त्यासाठी निधीची तरतूद करण्यास मान्यता देण्यात आली. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक झाली. त्यामध्ये ४३ अपघातजन्य ठिकाणांची माहिती देण्यात आली.

जिल्ह्यात सर्वाधिक अपघातजन्य ठिकाणे अहिल्यानगर-मनमाड रस्त्यावर आहेत. या रस्त्यावर जिल्ह्यात १२ अपघातजन्य ठिकाणे आढळली आहेत. याशिवाय अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर ९, अहिल्यानगर-पुणे रस्त्यावर ५, अहिल्यानगर-दौंड रस्त्यावर ३, अहिल्यानगर-कल्याण रस्त्यावर १, अहिल्यानगर-सोलापूर रस्त्यावर २ तर इतर अंतर्गत रस्त्यांवर उर्वरित ठिकाणे आहेत.

जागतिक बँक प्रकल्प, सार्वजनिक बांधकामचा अहिल्यानगर व संगमनेर विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचा अहिल्यानगर, पुणे व नाशिक विभाग तसेच रस्ते विकास महामंडळाच्या अंतर्गत महामार्गावरील ही ठिकाणे आहेत.

जिल्ह्यातील महामार्गावर अनेक हॉटेल, धाबे, पेट्रोल पंप आहेत. याकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील दुभाजक अनेक ठिकाणी तोडण्यात आले आहेत. त्यामुळेही अपघातांचे प्रमाण वाढले आहे. दुभाजक तोडणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सालीमठ यांनी दिले आहेत.

Story img Loader