अहिल्यानगर : बंद पडलेल्या व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकीत कर्जापोटी जप्त केलेल्या राहुरीतील डॉ. बा. बा. तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक घेण्याची प्रक्रिया २५ मे पर्यंत पूर्ण करण्याचा आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर आज, मंगळवारी राहुरीत कारखाना बचाव कृती समितीने मेळावा घेतला. समितीच्या न्यायालयीन संघर्षामुळेच कारखान्याचे अस्तित्व कायम राहिल्याचा दावा समितीचे संयोजक अमृत धुमाळ यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने कारखान्याची निवडणूक घेण्याची पूर्वतयारी सुरू केली आहे. त्यानुसार प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. या मतदार यादीत सुमारे २१ हजाराहून अधिक सभासदांची नावे आहेत. मात्र ही मतदार यादी केवळ जिल्ह्याच्या ठिकाणी लावण्यात आली, याबद्दल कारखाना बचाव कृती समितीने मेळाव्यात संताप व्यक्त केला.

सभासदांनी जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन मतदार यादीत आपले नाव आहे की नाही याची खात्री कशी करणार, या उलट तनपुरे कारखान्याचे कार्यक्षेत्र राहुरी तालुक्यात असताना प्रारूप मतदार यादी मात्र जिल्ह्याच्या ठिकाणी लावण्यात आली, वास्तविक कारखान्याच्या मालकीची कार्यस्थळावर अनेक कार्यालये आहेत, त्या ठिकाणी प्रारूप यादी ठेवणे आवश्यक असताना तसे घडले नसल्याने उपस्थित सभासदांनी तीव्र आक्षेप नोंदवला.

मतदार यादी कारखाना कार्यस्थळावर उपलब्ध करून द्यावी यासाठी जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांच्याकडे मागणी करणार असल्याचे समितीचे संयोजक अमृत धुमाळ, कामगार नेते भरत पेरणे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण कडू यांनी सांगितले. कारखान्याचे अस्तित्व राहावे यासाठी मोठा न्यायालयीन संघर्ष करण्यात कारखाना बचत कृती समितीला यश आले. आता लवकरच निवडणूक कार्यक्रम कधी जाहीर होतो याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे. मात्र सध्या कारखान्यावर जिल्हा बँकेची जप्ती असल्यामुळे बँक कोणती भूमिका घेतली यावरही बरेच काही अवलंबून असेल. मात्र असे असले तरी न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी करावीच लागणार असल्याचे चर्चा होत आहे.

कारखाना बचाव कृती समितीच्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ताराचंद पाटील गाडे (बारागाव नांदूर) होते. कारखान्याचे माजी संचालक ज्ञानेश्वर कोळसे, बाळासाहेब गाडे, लक्ष्मण गाडे, पंढरीनाथ पवार, सुखदेव मुसमाडे, गंगाधर तमनर, अजित कदम, विलास शिरसाठ आदीसह सभासद उपस्थित होते.