अहिल्यानगर : जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या -‘जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद -२०२५’ मध्ये १४७ सामंजस्य करार करण्यात आले. या करारातून २५१२.३२ कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित करण्यात आली आहे. या माध्यमातून ७१४२ जणांना रोजगार उपलब्ध होणे अपेक्षित आहे.

जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अतुल दवंगे यांनी ही माहिती दिली. जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन उद्योग सहसंचालक श्रीमती व्ही. बी. सोने (नाशिक) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मैत्री संस्थेचे नोडल अधिकारी किशोर गिरोला, सिडबीचे हेमंत मिश्रा, न्यू इंडिया इन्शुरन्सचे भगवान पवार, भारतीय टपाल विभागाचे दीपक नागपुरे, सल्लागार सुरज जाधव, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त निशांत सूर्यवंशी, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक आशिष नवले, एमआयडीसीचे विभागीय अधिकारी गणेश राठोड, उद्योजकांच्या ‘आमी’ संघटनेचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ, श्री. विनायक देशमुख आदी उपस्थित होते.

यावेळी उद्योजक व नवउद्योजकांना मैत्री विभाग, टपाल विभाग, सिडबी, जनरल इन्शुरन्स, जिल्हा कौशल्य विभागातील तज्ज्ञांनी त्यांच्याशी संबंधित विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. या उपक्रमामुळे आगामी काळात जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक वाढीस चालना मिळेल, अशी अपेक्षा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक दवंगे यांनी व्यक्त केली.