अहिल्यानगरः महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून पळ काढत चोऱ्या करणारे टोळीतील ४ जणांना पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. या टोळीने केलेले १२ गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आहेत. त्यांच्याकडून ११ लाख ८४ हजार ३२० रुपयांचे १५ तोळे सोने हस्तगत करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली. सोमनाथ मधुकर चौभे (३९, रा.अशोकनगर, श्रीरामपूर, अहिल्यानगर), अक्षय हिराचंद त्रिभुवन (२३, रा. लाडगाव चौफुली, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर), अनुप उर्फ चिंग्या गोडाजी चव्हाण (३६, रा.माळीसागज, वैजापूर) व संतोष म्हसु मगर (३६, रा. बेलापूर रस्ता, गायकरवस्ती, श्रीरामपूर) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत.

शिर्डीमध्ये दर्शनासाठी तामिळनाडुतून आलेल्या श्रीमती कुमारीदुर्गा रामप्रभु (४१) २० मार्चला रस्त्याने पायी जाताना मोटार सायकलवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्या गळयातील सोन्याची साखळी ओढून पळ काढला. याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर या घटनेचा समांतर तपास करण्यासाठी उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार मनोहर गोसावी, गणेश भिंगारदे, फुरकान शेख, बाळासाहेब गुंजाळ, भगवान थोरात, सुनिल मालणकर, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, अरूण मोरे यांचे पथक नियुक्त केले होते. शिर्डी शहरातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना पथकास हा गुन्हा संशयित आरोपी सोमनाथ मधुकर चौभे व त्याच्या साथीदारांनी केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने शोध घेऊन चौघांना ताब्यात घेतले.

यातील सोमनाथ चौभे याने साथीदार अक्षय हिराचंद त्रिभुवनसह मोटार सायकलवर शिर्डी येथे महिलेच्या गळयातील सोन्याची साखळी ओढुन चोरी केली. त्यावेळी चिंग्या गोडाजी चव्हाण व संतोष म्हसु मगर या दोघांनी त्यास मदत केल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांच्या अधिक चौकशीत काही महिन्यापासुन शिर्डी, संगमनेर, अहिल्यानगर व श्रीरामपूर येथे अशाच पध्दतीने १२ महिलांच्या गळयातील सोन्याचे दागीने चोरी केल्याची कबुली चौघांना दिल्याचे पोलिस निरीक्षक आहेर यांनी सांगितले.

आरोपी अनुप उर्फ चिंग्या गोडाजी चव्हाण याने चोरी केलेल्या सोन्यापैकी काही सोने हे गंगापूर येथील सोनारास विकल्याची माहिती दिली. या सोनाराने सोन्याची साखळी वितळवून केलेल्या ५ लाख ५३ हजार ८४० रु. किंमतीची सोन्याची लगड तसेच आरोपी सोमनाथ चौभे याने काही दागिने हे कोळपेवाडी (कोपरगाव) व काही दागिने महालगाव (वैजापूर) येथील सोनारास विकल्याची माहिती दिली. या दोघांकडून तसेच चौभे याने त्याच्या सासरी कोळपेवाडी येथे ठेवलेले असे एकुण ५ लाख ५० हजार ४८० रू. किंमतीचे तसेच गुन्हयांत वापरलेली मोटार सायकल जप्त करण्यात आलेली आहे.