अहिल्यानगरः शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये नेमलेले अधिकारी व कर्मचारी नागरिकांच्या संरक्षणासाठी आहेत की लोकांना लुटण्यासाठी असा थेट प्रश्न आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना विचारला आहे. अशा पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या टोळीवर कारवाई केली नाही तर आपल्याला राज्य सरकारकडे तक्रार करावी लागेल, असाही इशारा त्यांनी दिला आहे.
शहरातील वाढत्या चोऱ्या व दरोड्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी नागरिकांच्या शिष्टमंडळासह आमदार जगताप यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी हा आरोप केला. यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, डॉ. महेश वीर, राजेश भंडारी, आदेश चंगेडिया, योगेश चंगेडिया, राजेंद्र बलदोटा, सतीश देसरडा, राजेंद्र मुथा, बाबूशेठ बोरा, संजय राका, मुकुंद खासे, संदेश कटारिया, पंकज पटेल, समीर मुथा, रवींद्र शेलोत, अभय लुनिया आदी उपस्थित होते.
पोलीस ठाण्यांचे प्रमुख अधिकाऱ्यां भोवती असलेले कर्मचारी केवळ अवैध धंद्याशी संपर्क असणारे आहेत. त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. पोलीस निरीक्षकांना जेवायला घेऊन जातात आणि तेथे तडजोडी करतात. अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, त्यांची बदली करावी. अशा कर्मचाऱ्यांचे शहरात रॅकेट आहे. ते फक्त पैसे गोळा करत फिरतात. कापड बाजारात दुकाने खाली करून घेण्याच्या तडजोडी पोलीस ठाण्यामध्ये होतात. या पोलिसांवर कोणाचा धाक आहे की नाही हे तपासण्याची वेळ आली आहे असाही थेट आरोप आमदार जगताप यांनी केला.
संदर्भात आमदार जगताप यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदनही दिले. शहरात महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढण्याचे प्रकार वाढले आहेत. पूर्वी पोलीस गस्त घालायचे, नागरिकांना भेटायचे, चौकात असणाऱ्या वहीवर नोंदी करायचे, अनुचित घटना घडल्यास तातडीने बीट मार्शल घटनास्थळी जायचे. परंतु अशी यंत्रणाच आता कोठे राहिली नाही. त्यामुळे नागरिकांच्या संरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पूर्वी शहर रात्री ११ वा. बंद केले जायचे. आता मात्र पहाटे तीन-चार पर्यंत वर्दळ दिसते. काही वेगळ्या विचारांचे लोक बसस्थानकावर फिरतात. ते कुठल्यातरी भागात राहतात. हेच दरोडेखोर असावेत. पोलिसांनी त्यांची वाहने, कागदपत्रे तपासली पाहिजेत. विना क्रमांकाच्या गाड्या शहरात फिरतात. याकडेही लक्ष वेधण्यात आले.
बुरुडगाव उपनगरात गेल्या काही महिन्यांपासून चोरट्यांनी धुमकुळ घातला आहे. पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करूनही तपास होत नाही. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या भागात व्यापारी व प्रतिष्ठित उद्योजक राहतात. पोलीस अधीक्षकांनी या सर्व घटनांची वेळेस दखल घ्यावी व शहरात गस्त वाढवावी, अशी ही मागणी आमदार जगताप यांनी केली.