अहिल्यानगरः कर्नाटकमधून सुमारे २८ लाख रूपये किंमतीचा ४२ टन हरभरा घेऊन हरीयाणा येथे जात असलेल्या मालमोटार चालकाचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून करण्यात आला. अनुपसिंह गोपाळसिंह बालेचा (४३ रा. नोखा, बिकानेर, राजस्थान) असे खून झालेल्या चालकाचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अहिल्यानगर तालुक्यातील वाळुंज ते नारायणडोह जाणार्‍या बाह्यवळण रस्त्यावरील नारायणडोह शिवारात आज, मंगळवारी ही घटना घडली. लुटीच्या उद्देशाने हा खून करण्यात आल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. खून करणार्‍या दोघा संशयितांना अहिल्यानगर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. साहेबा आनंदा गायकवाड व उस्वाल इंपिरिअल चव्हाण (दोघे रा. वाळुंज, अहिल्यानगर) अशी त्यांची नावे आहेत. पोलीस अंमलदार रमेश गांगर्डे यांच्या फिर्यादीवरून दोघांविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनुपसिंह यांनी त्यांच्या मालमोटारीत कर्नाटकमधून सुमारे २८ लाख रूपये किमतीचा ४२ टन हरभरा भरला. हरभरा हरीयाणा येथे पोहोच करण्यासाठी ते अहिल्यानगरमार्गे हरीयाणाच्या दिशेने जात होते. दरम्यान, ते आज सकाळी नारायणडोह शिवारात आल्यानंतर त्यांना दोघांनी अडविले. त्यांच्या ताब्यातील २८ लाखाचा हरभरा व ४० लाखाची मालमोटार असा ६८ लाखाचा मुद्देमाल लुटण्यासाठी दोघांनी अनुपसिंह यांचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून करून त्यांना ट्रकच्या खाली ढकलून दिले.

दोघे लुटारू मालमोटार घेऊन जाताना वीजपोलला धडक दिली. त्याचवेळी मालमोटार लुटली जात असल्याचे स्थानिकांच्या लक्षात त्यांनी हा प्रकार पोलिस अंमलदार गांगर्डे यांना दूरध्वनी करून सांगितला. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोघांना ताब्यात घेतले. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलिस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) संपत भोसले, सहायक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते यांनी घटनास्थळी धाव घेतली. खून लुटीच्या उद्देशाने केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.