अहिल्यानगर : बोल्हेगाव उपनगरातील काकासाहेब मेडिकल फाउंडेशन या शैक्षणिक संकुलातील पाच महाविद्यालये, कार्यालय, रुग्णालय, वसतिगृहाची जागा आज, गुरुवारी सायंकाळी न्यायालयाच्या आदेशाने पोलिस बंदोबस्तात जागा मालकाच्या ताब्यात देण्यात आली. भाडेकरारबाबत न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याचा निकाल विरोधात गेल्यानंतर ही कार्यवाही करण्यात आली. यामुळे संस्थेतील महाविद्यालयांत शिक्षण घेणारे विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत. यामध्ये वसतिगृहाच्या इमारतीचा समावेश असल्याने विद्यार्थिनीं पुढे बाका प्रसंग निर्माण झाला.

बोल्हेगावातील या शैक्षणिक संकुलात बीएचएमएस, बीएससी नर्सिंग, बी फार्मसी, एएनएम व जीएनएम अभ्यासक्रम चालवणारे महाविद्यालये आहेत. महाविद्यालय होमिओपॅथीचे आहे. मुलींसाठी वस्तीगृह आहे.

यासंदर्भात माहिती देताना जागा मालक दयानंद बिल्डर्सचे अनिल जाधव यांनी सांगितले की, संस्थेबरोबर भाडेकरार ऑगस्ट २०१८ मध्ये संपुष्टात आला. ही जागा १६.५ एकर आहे. दरम्यान संस्थेने जागेचा उताराही स्वतःच्या नावावर करून घेतला व महाबँकेकडून तीन कोटी रुपये कर्ज घेतले. दरम्यान आम्ही न्यायालयात दाद मागितल्यानंतर न्यायालयाने ३० दिवसात जागा खाली करण्याचे आदेश दिले होते. त्याचे पालन न झाल्याने सन २०१९ मध्ये दरखास्त दाखल करण्यात आली. त्याचा निकाल लागल्यानंतर आज न्यायालयाच्या आदेशाने पोलीस बंदोबस्तात ताबा घेतला.

यासंदर्भात माहिती देताना संस्थेचे सीईओ समीर ठाकरे व माजी प्राचार्य संस्थेतील प्राध्यापक डॉ. नीलिमा भोज यांनी सांगितले की, संस्थेचा भाडेकरार ९९ वर्षांचा आहे. या विरोधात आम्ही पुढील तीन सुट्टी असल्याने सोमवारी वरिष्ठ न्यायालयात दाद मागणार आहोत. विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही. काहीजण गोंधळ पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु संस्थेच्या कोणत्याही त्रुटी नाहीत. आम्ही आमची जबाबदारी पार पाडू. कुणीही अफवांना बळी पडू नये. विद्यार्थ्यांची संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानी व्यवस्था करण्यात आली आहे तर ज्यांना शक्य आहे अशा विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले आहे.

या शैक्षणिक संकुलात सुमारे ७०० विद्यार्थी शिकत आहेत. मुलींसाठी वसतिगृह आहे. कामगार रुग्णालय आहे, फार्मसीच्या विद्यार्थ्यांची सोमवारपासून प्रात्यक्षिक परीक्षा आहे. होमिओपॅथीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा तोंडावर आली आहे. त्यामुळे शिक्षण घेणारे विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. दरम्यान जागा मालक अनिल जाधव यांनी सांगितले की विद्यार्थ्यांना आम्ही आवश्यक ते सहकार्य करू. परंतु परिस्थिती लक्षात घेऊनही संस्थेने विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू ठेवले. त्याची जबाबदारी संस्थेची आहे.