नगर : शहरात राजकीय वरदहस्तातून मोकळ्या भूखंडांवर ताबेमारीच्या घटना गुंडांच्या टोळ्यांकडून सर्रासपणे घडत आहेत आणि दुसरीकडे महसूल व दुय्यम निबंधक कार्यालयातून जागा परस्पर दुसऱ्याच्या नावावर खरेदी-विक्री करण्याचे गुन्हेगारी प्रकारही तितक्याच सर्रासपणे घडत आहेत. या दोन्ही विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या संगनमताने जागा परस्पर दुसऱ्याच्या नावावर करण्याचे गेल्या दीड वर्षात जिल्ह्यात तब्बल २७ गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये एकूण २१३ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील ९ महसूल व दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी आहेत. जमिनीला सोन्यापेक्षा अधिक मोल प्राप्त झाल्याने ‘जागा लुटी’चे नवनवीन फंडे निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. महसूल व दुय्यम निबंधक कार्यालयातील लागेबांधेशिवाय हे घडलेले नाहीत. महसूल मंत्री नगर जिल्ह्यातील असताना, त्यांच्याच जिल्ह्यात, त्यांच्याच विभागात हे गैरव्यवहार घडले आहेत. मात्र प्रतिबंधासाठी उपाययोजना झालेल्या नाहीत. दाखल झालेले बहुतांशी गुन्हे हे दुय्यम निबंधक कार्यालयात बनावट जागा मालक उभे करून, बनावट आधारकार्ड, बनावट सातबारा उतारा सादर करत दुसऱ्याच्या मालकीच्या जागा गुन्हेगारांनी स्वत:च्या नावावर करून घेतल्या आहेत. त्याचे खरेदी-विक्रीचे दस्त नोंदवले गेले आणि सातबाऱ्यावर नोंदीही केल्या गेल्या आहेत. काही गुन्हे जागा मालकाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या जागी बनावट व्यक्ती उभी करून केले गेले आहेत. नगर व नेवाशात तर तहसीलदारांचा बनावट आदेश तयार करून मंडलाधिकारी व तलाठ्याने जागा हस्तांतरित केल्या आहेत. जिल्ह्यात दाखल २७ गुन्ह्यांतील निम्मे नगर शहरातील कोतवाली आणि पाथर्डी (प्रत्येकी ७, एकूण १४), या दोन पोलीस ठाण्यात दाखल आहेत. खरेदी-विक्रीतील बनवेगिरी केवळ एकट्या पाथर्डीतील दुय्यम निबंधकांच्याच निदर्शनास आली. त्यांनी स्वत:हून संबंधितांविरुध्द गुन्हे दाखल केले. इतर ठिकाणी मात्र डोळेझाक, संगनमत, हलगर्जीपणा असे काही घडले असावे.

२७ पैकी तब्बल २२ गुन्हे जिल्ह्याच्या दक्षिण भागातील, तर ५ गुन्हे उत्तर जिल्ह्यातील आहेत. विशेष म्हणजे ‘जागा लुटी’च्या बहुसंख्य गुन्ह्यात कागदपत्रे तयार करण्याचे प्रकार निदर्शनास येऊनही पोलीस तपासात यावर फारसा प्रकाश पडलेला नाही. त्यामुळे जणू ‘भू-माफियां’ना मोकळे रानच मिळाले आहे.

हेही वाचा : सांगली : जतमध्ये भाजपाच्या बैठकीत भूमिपुत्राच्या प्रश्नावरून वादावादी

कायद्याचा चुकीचा अर्थ काढत, तरतुदींच्या पळवाटा शोधून (महार हाडोळा इनामदार ६ ब वर्ग) भू-माफियांच्या घशात जमीन घालणाऱ्या ५ कर्मचाऱ्यांसह वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील अनेक गुन्हे हे जागा मालक बाहेरगावी राहतो, त्याच्या जागेकडे लक्ष ठेवण्यास कोणी नाही, अनेक वर्षांपासून मोकळ्या जागा पडल्या आहेत, अशा जागांवर डोळा ठेवून त्या हडपण्याची प्रकारी वाढल्या आहेत. राजकीय पाठबळातून गुन्हेगारी टोळ्या ताबेमारी करतात, मात्र अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या संगनमताने टोळ्या ‘व्हाईट कॉलर’ पध्दतीने जागा हडप करत आहेत.

टोळ्या सक्रिय

आधारकार्ड पडताळणीत स्पष्टता नाही, दुय्यम निबंध कार्यालयातील गर्दीचा गैरफायदा घेऊनही गुन्हे केले जात आहेत. वयोवृद्ध जागा मालक बाहेरगावी राहत आहे हे शोधून त्याच्या जागेची खरेदी-विक्री परस्पर केल्याचे गुन्हे दाखल आहेत. आता सातबारा ऑनलाइन उपलब्ध असल्याने जागा मालकांनी अधूनमधून जागा आपल्या नावावर आहेत का, हे तपासले पाहिजे. अशा गुन्ह्यांमध्ये टोळ्या सक्रिय असल्याचे निदर्शनास येत आहे, असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी सांगितले.

हेही वाचा : राजकोट येथील छत्रपतींच्या नव्या पुतळ्याची जबाबदारी सुतारांकडे – दीपक केसरकर

बनावट आधारकार्ड तपासणी यंत्रणेचा अभाव

आधारकार्ड किंवा इतर कागदपत्रे बनावट तयार केली आहेत, याच्या पडताळणीसाठी दुय्यम निबंधकांकडे यंत्रणा नाही. सातबारा, ‘रेरा’कडील नोंदणी ऑनलाइन उपलब्ध आहेत, मात्र बिनशेती आदेश, बांधकाम परवाने ऑनलाइन उपलब्ध नाहीत. दस्तनोंदणी ऑनलाइन पद्धतीने होते. मात्र ही यंत्रणा वारंवार बंद पडते. त्यामुळे मानवी पध्दतीने ओळख पटवून व्यवहार नोंदणी होते. बनवेगिरीचा प्रकार निदर्शनास आल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत. – महेंद्र महाबर, सहजिल्हा निबंधक, नगर