सोलापूर : सरत्या वर्षाला निरोप देत नव्या वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू असताना त्याचेच औचित्य साधून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांच्या प्रचंड गर्दीने अक्कलकोट नगरी फुलून गेली आहे. शनिवारी सुमारे ८० हजार भाविक दाखल झाले असून उद्या ३१ डिसेंबर रोजी दोन ते तीन लाख भाविक येण्याची अपेक्षा आहे. यानिमित्ताने वटवृक्ष श्री स्वामी महाराज देवस्थानासह शेजारच्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या संपूर्ण यात्री निवास व भक्त निवास तसेच सर्व हाॕटेल आणि लाॕजेस भरून गेली आहेत. शहरात प्रत्येक रस्त्यावर भाविकांसह वाहनांची तुडूंब गर्दी दिसून येते. त्यामुळे मंदिरात दर्शन व्यवस्थेसह निवास आणि भोजन व्यवस्थेचा भार वाढला आहे. वाहतुकीवर नियंत्रण करताना पोलीस यंत्रणेवरही भार वाढला आहे. अक्कलकोटमध्ये निवास व्यवस्था तोकडी पडल्यामुळे भाविक सोलापुरात मुक्काम करणे पसंत करीत आहेत. त्यामुळे सोलापुरातील बहुसंख्य हाॕटेलही फुलून गेले आहेत.यानिमित्ताने अक्कलकोट व सोलापुरात मोठी आर्थिक उलाढाल होत आहे.

श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येतात. त्यात वरचेवर भर पडत आहे. सलग शासकीय सुट्ट्यांसह दर गुरूवारी तसेच श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी, प्रकट दिन, गुरू पौर्णिमा, दत्त जयंती उत्सव काळात लाखो भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते. मुंबई, ठाणे, पुणे, कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम मराराष्ट्रासह शेजारच्या कर्नाटक, तेलंगणा आदी भागातून भाविकांचा ओघ अक्कलकोट नगरीत सुरू असतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उत्सव काळात वटवृक्ष श्री स्वामी महाराज देवस्थानाकडील भक्त निवासासह महाप्रसाद तसेच शेजारच्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची सहा हजारांपेक्षा अधिक खोल्यांची यात्री निवासातील निवास व्यवस्था अपुरी पडते. अन्नछत्र मंडळाच्या महाप्रसाद कक्षात आलेले भाविक महाप्रसादापासून सहसा वंचित राहात नाहीत. उत्सव काळात लाखभर भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात. त्याचे उत्कृष्ट नियोजन अन्नछत्र मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष जन्मेंजयराजे भोसले आणि प्रमुख कार्यकारी विश्वस्त आमोलराजे भोसले यांच्या देखरेखीखाली केले जाते. आजही हे नियोजन यशस्वीपणे करण्यात आले आहे. श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा प्रचंड प्रमाणात लागतात. दर्शन रांगेसह मंदिरातील व्यवस्था सुरळीत होण्यासाठी मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे व सचिव आत्माराम घाटगे आदी मंडळी जागरूक आहेत.