अलिबाग : वनविभाग आणि सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर आणि दिवेआगर समुद्र किनाऱ्यांवर सागरी कासव संवर्धन मोहिम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेला याता चांगले यश मिळण्यास सुरूवात झाली आहे. गेल्या बुधवारी हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्यावर पन्नासहून अधिक कासवांची पिल्ले समुद्रात सुखरूप सोडण्यात आली.
भारतीय उपखंडात चार ते पाच प्रकारच्या सागरी कासवांचा वावर दिसून येतो. यात प्रामुख्याने ऑलिव्ह रिडले, ग्रीन टर्टल, हॉक्स बिल टर्टल आणि लेदर बॅक टर्टल या चार प्रकारच्या सागरी कासवांच्या प्रजातींचा समावेश आहे. कोकण किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले आणि ग्रीन टर्टल या दोन प्रकारच्या सागरी कासवांचे अस्तित्व दिसून येते. मात्र गेल्या काही वर्षांपासून विविध कारणांमुळे या कासवांचे अस्तित्व धोक्यात आले होते.
हेही वाचा : Petrol Diesel Price Today: महाराष्ट्रात बदलले इंधनाचे दर; वाचा मुंबई-पुण्यात काय आहे १ लिटर पेट्रोलचा भाव
किनारपट्टीवरील भागात वाढणारे प्रदूषण, मासेमारी जाळ्यात अडकून होणारा कासवांचा मृत्यू, कासवांची तस्करी आणि अंडी खाल्यामुळे कासवांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन वन विभाग, सामाजिक संस्था आणि स्थानिकांच्या मदतीने किनारपट्टीवर कासव संवर्धन मोहिम राबविण्यात येत आहे. ज्याला आता चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.
रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर आणि दिवेआगर समुद्र किनाऱ्यांवर सागरी कासव संवर्धन मोहीम राबविण्यात आली. रोहा वनविभागाच्या पुढाकाराने, हरिहरेश्वर पर्यटन विकास संस्था आणि स्थानिकांच्या मदतीने हरिहरेश्वर समुद्र किनारी ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या सागरी कासवांची अंडी संवर्धन करून ठेवण्यात आली आहे. दीड महिन्यानंतर यातून कासवांची पिल्ले बाहेर पडण्यास सुरवात झाली, बुधवारी यातून पन्नासहून अधिक कासवांची पिल्ले बाहेर पडली आहेत. त्यांना सकाळी सुरक्षितपणे समुद्रात सोडण्यात आले आहेत. येत्या काही दिवसांत उर्वरित अंड्यांमधून पिल्ले बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरु राहणार आहे.
हेही वाचा : “प्रसिद्धीसाठी शिंदे सरकारची दिवसाला २.८० कोटींची उधळपट्टी”, काँग्रेसचा आरोप; शासकीय आदेश केला शेअर!
संवर्धन कसे होते.
साधारणपणे डिसेंबर ते एप्रिल या कालावधीत कासव किनारपट्टीवर येऊन अंडी घालतात. एका वेळी शंभर ते दीडशे अंडी घातली जातात. यातून पंचेचाळीस ते पासष्ट दिवसांनी पिल्लं बाहेर येण्यास सुरूवात होते. तोवर या अंड्यांचे संवर्धन करणे गरजेचे असते. अन्यथा अंडी नष्ट होण्याची भीती असते. त्यामुळे किनाऱ्यावर जाळी लावून तयार केलेल्या संरक्षित क्षेत्रात अंड्यांची जपणूक केली जाते. अंड्यातून पिल्ले बाहेर आली की ती तातडीने समुद्रात सोडली जातात. अन्यथा पिल्ले दगावू शकतात.
दरवर्षी हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यावर कासव संवर्धन प्रकल्प राबविला जातो. अंड्यातून बाहेर पडलेल्या कासवांचा समुद्रपर्यंतचा प्रवास पाहणे हा एक विलक्षण अनुभव असतो, स्थानिकांमध्येही कासव संवर्धनाबाबत चांगली जागृती निर्माण झाली असून येणाऱ्या पर्यटकांना या प्रकल्पाची माहिती आवर्जून दिली जाते.
सिद्धेश पोवार (सचिव, हरिहरेश्वर पर्यटन विकास संस्था)