अलिबाग: कर्जत तालुक्यातील नेरळ येथील तिहेरी हत्याकांडाची उकल करण्यात रायगड पोलीसांना यश आले आहे. मालमत्तेच्या वादातून सख्ख्या भावानेच ही हत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. ३६ तासांच्या चौकशीनंतर या प्रकरणातील आरोपी हनुमंत जैतु पाटील याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी सकाळी चिकनपाडा येथे राहणाऱ्या मदन जैतु पाटील (वय ३५), अनिशा मदन पाटील (वय ३०) आणि विनायक मदन पाटील (वय १०) अशा तिघांचे मृतदेह घराच्या मागील भागात असलेल्या ओढ्यात आढळून आले होते. तिघांच्या डोक्यावर धारधार शस्त्राने वार केल्याच्या खूणा होत्या. त्यामुळे तिघांची हत्या करून त्यांचे मृतदेह नदीपात्रात टाकण्यात आल्याचे आढळून आले होते. या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा : “भाजपाच्या एका मोठ्या नेत्याने परवा अजितदादांना…”, रोहित पवारांची पोस्ट; म्हणाले, “शिंदे गटाला १७ जागा…”

तिहेरी हत्याकांडाची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे प्रमुख बाळासाहेब खाडे यांना या प्रकरणाचा समांतर तपास करण्याचे निर्देश दिले होते. नेरळसह, कर्जत आणि खोपोली येथील पोलीस पथकांना या गुन्ह्याच्या तपासासाठी बोलविण्यात आले होते. तपासा दरम्यान मयत मदन जैतु आणि भाऊ हनुमंत यांच्यात राहते घराची जागा आणि रेशन कार्ड वरील नावे कमी करण्यावरून वाद सुरू असल्याचे समोर आहे. यातून हनुमंत याने मदन आणि त्याची पत्नी यांस मारहाणही केली होती अशी बाब समोर आली. तिहेरी हत्याकांड घडले त्या दिवशी हनुमंत आणि त्याची पत्नी घरी नसल्याची बाब समोर आली त्यामुळे पोलीसांचा संशय बळावला. त्यानी हनुमंत याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र तो पोलीसांना उडवा उडवीची उत्तरे देत होता. प्रत्येक वेळी पोलीसांना वेगवेगळी महिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होता. अखेर ३६ तासांच्या चौकशी नंतर त्याने आपल्या कृत्याची कबूली दिली. मालमत्तेच्या वादातून भाऊ, त्याची गर्भवती पत्नी, आणि दहा वर्षाच्या मुलाची डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून हत्या केली. नंतर तिघांचे मृतदेह घरामागील ओढ्यात नेऊन टाकले.

सीसीटीव्ही फुटेज आणि पांढऱ्या शर्टामुळे गुन्ह्याची उकल

आरोपी हनुमंत याने सख्खा भाऊ आणि त्याच्या कुटूंबाचा नियोजनबध्द पध्दतीने काटा काढण्याचे ठरवले होते. त्यासाठी पूर्व तयारी केली होती. स्वतःवर संशय येऊ नये यासाठी खबरदारी घेतली होती. हत्याकांड करण्यापूर्वी आरोपीने त्याच्या पत्नीला माहेरी पाठवून दिले होते. स्वता चूलत मामाच्या घरी जाऊन बसला होता. रात्री उशीरा सगळे झोपल्यावर तो मामाच्या घरून बाहेर पडला. भावाच्या कुटूंबाची हत्या करून पुन्हा घरी येऊन झोपला. पण त्याच्या रात्रीच्या हालचाली एका शाळेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या, तर हनुमंतने रात्री घातलेला पांढरा शर्ट सकाळी बदललेला असल्याचे तपासात समोर आले. याबाबत विचारणा करताच त्याने आपल्या कृत्याची कबूली दिली. दरम्यान पोलीसांनी हनुमंत जैतु याला अटक केली असून, कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी धुळा टेळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा : Eknath Khadse on Devendra Fadnavis: “…म्हणून माझा भाजपाप्रवेश थांबला”, एकनाथ खडसेंचा मोठा दावा; थेट देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजनांची नावं घेत म्हणाले…

गुन्ह्याचा तपास तातडीने पूर्ण करून याबाबतचे दोषारोपपत्र न्यायायालयात दाखल केले जाईल. आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी न्यायालयात मागणी केली जाईल.

सोमनाथ घार्गे (पोलीस अधीक्षक, रायगड)
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In alibag at neral mystery of murder of three members of the same family reveled css