अलिबाग: रायगड जिल्ह्यातून ठाणे जिल्ह्यात जाणाऱ्या अवजड वाहतूकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. १६ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट या कालावधीसाठी हे निर्बंध लागू राहणार आहेत. ठाण्यातील वाहतुक कोंडीची समस्या लक्षात घेऊन रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी याबाबतची वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी केली आहे.

हेही वाचा : Sharad Pawar appeal: “शांतता प्रस्थापित करायची असेल तर…”, राज्यातील तणावपूर्ण स्थितीवर शरद पवारांचे महत्त्वाचे भाष्य

ठाणे शहर आणि त्यालगतच्या परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येला लक्षात घेऊन शहरात सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या सत्रात जड आणि अवजड वाहतूक निंयंत्रिक करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यानूसार रायगड जिल्ह्यातून ठाणे शहराकडे जाणाऱ्या जड आणि अवजड वाहतूकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. पहाटे ४ ते सकाळी दहा वाजेपर्यंत आणि दुपारी दोन ते रात्री नऊ वाजेपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत. या कालावधीत जड आणि अवजड वाहने, कंटेनर्स, मल्टी अँक्सल वाहने यांना ठाणे शहर आणि त्या लगतच्या परिसरात जाता येणार नाही. जिवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारे ट्रक, पोलीस, अग्नीशामन दल, रुग्णवाहीका आणि प्रवासी वाहतूक करणारी वाहने यांच्यासाठी हे निर्बंध लागू नसतील असेही या आदेशात स्पष्ट नमुद करण्यात आले आहे.