अलिबाग : अलिबाग तालुक्यातील धरमतर पुल ते अलिबाग, मांडवा ते अलिबाग, आणि अलिबाग रेवडांदमार्गे मुरुड या मार्गावर २८ व २९ डिसेंबर असे दोन दिवस अवजड वाहनांच्या वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी याबाबतचे आदेश पारित केले आहेत.
रायगड हा पर्यटन जिल्हा असल्याकारणाने पर्यटक हे मांडवा, किहीम, अलिबाग, आक्षी, नागाव, रेवदंडा, काशिद, मुरूड अशा पर्यटन स्थळी मोठ्या प्रमाणात आपआपली वाहने घेऊन येत असतात. सध्या नाताळ निमित्ताने विद्यार्थ्यांना सुट्टी असल्याकारणाने पर्यटक हे रायगड जिल्ह्यामध्ये फिरण्याकरीता वेगवेगळ्या समुद्र किनाऱ्यावरील बीचला भेटी देत असतात. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग तसेच शहरामध्ये पर्यटकांची मोठ्या प्रमाणात रेलचेल असून त्यातच महामार्गावरील जड-अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत आहे.
हेही वाचा : Bajrang Sonwane : “संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर…”, बजरंग सोनवणे यांचा मोठा इशारा
वडखळ-अलिबाग हा रस्ता एकेरी रस्ता आहे. तसेच अलिबाग-रेवस व अलिबाग-रेवदंडा-मुरूड हे रस्ते अरूंद आहेत. पर्यटकांची प्रचंड प्रमाणात येणारी व जाणारी वाहने व त्याच वेळी रोडवरून होणारी डंपर, ट्रक व इतर जड-अवजड वाहनांची वाहतूक कोंडी होण्याची तसेच अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
हेही वाचा : सतरा वर्ष उलटून ही नुकसान भरपाई न दिल्याने, जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्तीची कारवाई
२८ व २९ डिसेंबर रोजी शनिवार व रविवार सार्वजनिक सुट्टी असल्याने पर्यटक हे मोठ्या प्रमाणात येणे अपेक्षित आहे. वाहतूक कोंडीमुळे पर्यटक व नागरीकांना मानसिक त्रास सहन करावा लागू नये व सध्या घडत असलेले अपघात पाहता, अपघाताचे प्रमाण कमी होण्याच्या दुष्टीकोनातून उपाययोजना म्हणून तसेच पर्यटक व नागरीकांचा प्रवास सुखरूप व्हावा याकरीता २८ डिसेंबर रोजी सकाळी ६ ते दि. २९ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत धरमतर पुल ते अलिबाग तसेच अलिबाग ते मांडवा जेट्टी व अलिबाग-रेवदंडा-मुरूड या राज्यमार्गावरील जड-अवजड वाहनांकरिता जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी वाहतूक बंदी अधिसूचना जारी केली आहे. हा निर्णय अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू नसेल , असेही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.