अलिबाग : नाताळ सुट्ट्यांच्या निमित्ताने कोकणातील समुद्रकिनारी पर्यटकांची संख्या वाढत असताना दुसरीकडे स्थानिकांच्या हौसेपोटी पर्यटकांची त्रेधातिरपीट होत असल्याचे चित्र मुरूड समुद्रकिनारी समोर आले आहे. मुरूड समुद्रकिनारी स्थानिकांकडून सकाळच्या सुमारास बैलगाडा शर्यतींसाठी सराव केला जातो आहे. कुटुंबिंयासोबत, ज्येष्ठ, लहानग्यांची या बैलगांड्यांच्या ताफ्यातून जीव वाचवताना त्रेधातिरपीट होते आहे. या थरकाप उडवणाऱ्या शर्यतींच्या सरावावर आता पर्यटक संताप व्यक्त करत आहेत. पर्यटन महत्वाचे की हौस असा प्रश्न आता मुरुडमध्ये येणारे पर्यटक विचारत आहेत. सोमवारी एका पर्यटक कुटुंबाने याबाबतचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे.
हेही वाचा : Santosh Deshmukh : संतोष देशमुख यांची मुलगी भावूक; म्हणाली, “माझ्या वडिलांना न्याय मिळाला पाहिजे, मी…”
आठ ते दहा बैलगाड्या एकाच वेळी समुद्र किनारी पळवल्या जातात. या बैलगाड्यांसोबत स्थानिकांच्या तितकच्या दुचाकी पळत असतात. या दुचाकी बैलगाड्यांच्या पुढे आणि तीनही बाजूंना असतात. पर्यटक आणि मार्गात येणाऱ्या प्रत्येकाला तातडीने हटवण्यासाठी जोरजोराने हॉर्न आणि शिट्या वाजवल्या जातात. त्यामुळे पर्यटकांना आपल्या साहित्य आणि लहान मुलांसह ज्येष्ठांनाही सुरक्षित स्थळी धाव घ्यावी लागते. त्यामुळे पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.