अलिबाग : मुंबई- गोवा महामार्गावरील अवजड वाहतुक ५ जानेवारीला बंद ठेवली जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी योगश म्हसे यांनी जारी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत रायगड जिल्ह्याचा ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम येत्या ५ जानेवारीला लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापिठाच्या परिसरात पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील विविध शासकीय योजनांचे १ लाख लाभार्थी येणार आहेत. त्यांच्या वाहतुकीसाठी २ हजार बसेस आणि शेकडो चार चाकी वाहनांची व्यवस्था प्रशासनाने केली आहे. यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा : “जितेंद्र आव्हाडांवर २४ तासांत गुन्हा दाखल करा, अन्यथा वर्तक नगर पोलीस ठाण्याबाहेर…”, अजित पवार गटाचा इशारा
ही बाब लक्षात घेऊन मुंबई- गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक ५ जानेवारीला सकाळी १२ ते रात्री ११ वाजेपर्यंत, तर खोपोली- पाली ते वाकण मार्गावरील अवजड वाहतूक सकाळी आठ ते बारा आणि दुपारी तीन ते रात्री दहा या कालावधीसाठी बंद ठेवली जाणार आहेत. जीवनावश्यक वस्तू, दूध, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, औषधे आणि ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांना यातून सूट देण्यात आली आहे. मुंबई गोवा महामार्गावर पेण तालुक्यातील खारपाडा ते पोलादपूर तालुक्यातील कशेडी दरम्यान अवजड वाहतूक बंद राहणार आहे. या कालावधीत महामार्गावरील सर्व अवजड वाहने पर्यायी मार्गाने वळवली जाणार आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत.