अलिबाग : येथे पोल्स निर्मितीच्या आडून अंमली पदार्थ निर्मिती करण्याचा कारखाना तीन जणांनी सुरू केला होता. यातून एमडी पावडरची निर्मिती मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सरकारी यंत्रणांची नजर चुकवत मेफेड्रोन तयार केले जात होते. मात्र रायगड पोलीसांना याचा सुगावा लागताच त्यांनी कंपनीवर धाड टाकली आणि १०७ कोटींची एमडी पावडर जप्त केली.
खोपोलीच्या ढेकू गावाच्या हद्दीत ‘इंडीया इलेक्ट्रीक पोल्स मॅन्युफॅक्चरींग कंपनी’चा फलक आहे. या कंपनीत आतमध्ये ‘आंचल केमिकल’ नावाची दुसरी एक कंपनी सुरू होती. या कंपनीत बेकायदेशीरपणे प्रतिबंधित अंमली पदार्थ बनविले जात असल्याची खबर पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी कंपनीवर गुरूवारी रात्री छापा टाकला. यावेळी कंपनीत उग्र वास येत असल्याचे पोलीसांच्या निदर्शनास आले. कंपनी प्रशासनाकडे विचारणा केली असता त्यांच्याकडे रासायनिक प्रक्रिया करून पदार्थ बनवण्याची कुठलीही वैध परवानगी नसल्याचे दिसून आले. मात्र रासायनिक प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारून या ठिकाणी गुंगीकारक आणि प्रतिबंधीत मेफेड्रोन अर्थात एमडी तयार केले जात असल्याचे दिसून आले. नार्को तपासणी किटच्या मदतीने तपासणी केली असता कंपनीत तयार करण्यात येणारा माल हा एमडी असल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर ८५ किलो २०० ग्रॅम वजनाची एमडी पावडर पोलीसांनी जप्त केली. ज्याची बाजारातील किंमत ही १०७ कोटींच्या आसपास आहे. या शिवाय एमडी ड्रग पावडर बनविण्यासाठी वापरण्यात येणारे १५ लाख रुपयांचे कच्चे रसायन आणि ६५ लाख रुपये किंमतीची एमडी बनवण्यासाठी वापरण्यात आलेली यंत्रसामग्री पोलीसांनी जप्त केली आहे. या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायदा, गुंगीकारक औषधी द्रव्ये, मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ तील कलम ८ सी, कलम २२ सी आणि कलम २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक शितल राऊत या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत अशी महीती पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे आणि अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांनी खोपोलीत झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
या कारवाईत खोपोलीचे पोलीस निरीक्षक शितल राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर पोलीस उपनिरीक्षक प्रवीण स्वामी, सुधाकर लहाने, अभिजीत व्हराबळे, पोलीस हवालदार राजेंद्र पाटील सागर पाटील, सतीश बांगर आदींनी महत्वाची भूमिका बजावली.