अलिबाग : अलिबागचे माजी नगराध्यक्ष आणि शेकापचे जेष्ठ नेते प्रशांत नाईक यांनी राजकारणातही आमदार महेंद्र दळवींसोबत यावे आणि शिवसेनेची ताकद वाढवावी, अशी इच्छा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली, ते अलिबाग मधील लोणारे येथे आयोजित आमदार चषक क्रिकेट स्पर्धेदरम्यान बोलत होते. यावेळी आमदार महेंद्र दळवी, आमदार अनिकेत तटकरे, शेकापचे नेते आणि अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजा केणी यांच्यासह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
प्रशांत नाईक आणि महेंद्र दळवी हे कौटूंबिक जीवनात एकमेकांचे व्याही आहेत. आता क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने दोघे एका व्यासपीठावर आले आहेत. अशाच पद्धतीने राजकीय व्यासपिठावर दोघांनी एकत्र यायला हवे. याबाबत दोघांनी काय निर्णय घ्यायचा, कधी घ्यायचा हे आपआपसांत ठरवावे, ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. अनिकेत तटकरे हे देखील व्यासपिठावर आहेत. त्यांचाही माझ्या या मागणीला पाठिंबा आहे. त्यामुळे भविष्यातील राजकीय वाटचाल दोघांनी सोबत केली पाहीजे, असे मत पालकमंत्री सामंत यांनी व्यक्त केले.
हेही वाचा : “मविआ बैठकीत मनासारखी चर्चा झाली नाही”, प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले, “आमचे हट्ट…”
टेनिस क्रिकेट बॉल स्पर्धांना राजमान्यता मिळावी यासाठी राज्यस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. सहा महिन्यांपूर्वीच राज्यस्तरावर टेनिस क्रिकेट असोसिएशनची स्थापना करण्यात आली आहे. ज्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्याकडेच आहे. त्यामुळे सिझन बॉल क्रिकेट स्पर्धेप्रमाणेच या स्पर्धांना शासनस्तरावर मान्यता मिळाली पाहीजे यासाठी प्रय़त्न सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा : पुण्यात भाजपचे मोहोळ की देवधर ?
उद्धव ठाकरेंवर टीका…..
क्रिडा क्षेत्राप्रमाणेच राजकारणात खिलाडू वृत्ती गरजेची असते. एखाद्याचे मंत्रिपद गेले की ते खिलाडूवृत्तीने स्वीकारायला हवे. एखाद्याचे संघटनेतले पद गेले तरी त्याने तो निर्णय खिलाडू वृत्तीने मान्य करायला हवा. तसेच एखाद्याचे मुख्यमंत्री पद गेले आहे, तर ते खिलाडूवृत्तीने स्वीकारायला हवे. कायम स्वरुपी मीच मुख्यमंत्री असल्यासारखे राज्यभरात टिका करत फिरणे योग्य नाही. त्यामुळे खिलाडूवृत्ती दाखवत पुढे जायला हवे असा खोचक टोला उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.