अलिबाग : कर्जत विधानसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी कडून तयारी सुरू झाल्याने विद्यमान आमदार शिवसेनेचे महेंद्र थोरवे आक्रमक झाले आहेत. असे असले तरी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या मतदारसंघावरील दावा नाकारला नाही. त्या संदर्भातील निर्णय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री मी स्वतः प्रदेशाध्यक्ष म्हणून एकत्रित बसून घेवू असं स्पष्ट करतानाच सुनील तटकरे यांनी या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा अद्यापही असल्याचे संकेत दिले.
आज सुतारवाडी येथील निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते. लोकसभा निवडणूकीत रायगड लोकसभा मतदार संघातील सर्वच विधानसभा मतदार संघात महायुतीमधील घटक पक्षांनी एकत्रितपणे काम केलं. त्याची परीणिती मोठे मताधिक्य लोकसभेत मिळालं. इथल्या सर्वच मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे महायुतीचे काम करील. राहता राहिला प्रश्न कर्जतचा तेथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधाकर घारे इच्छुक आहेत. राज्यात असे अनेक राष्ट्रवादीचेही मतदारसंघ आहेत जेथे शिवसेनेचे नेते इच्छुक आहेत. परंतु त्या संदर्भातील निर्णय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मी स्वतः प्रदेशाध्यक्ष म्हणून एकत्रित बसून घेवू असं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.
जर कर्जतमध्ये लुडबुड केली तर आम्ही श्रीवर्धनमध्ये प्रमोद घोसाळकर यांना उभे करू असा इशारा कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी दिला होता. खुद्द प्रमोद घोसाळकर यांनीही तशी तयारी दर्शवली आहे. यावर बोलताना सुनील तटकरे म्हणाले की श्रीवर्धनबाबत कुणी वायफळ बडबड करत असेल तर त्यांची नोंद त्यांचे नेते भरत गोगावले, महेंद्र दळवी, योगेश कदम घेतील. अशा किरकोळ माणसांच्या तयारीबद्दल मला बालायचे नाही. वक्तव्याची दखल घेण्याच्या क्षमतेचे नाहीत त्याबददल मला अवाक्षर बोलायचे नाही असा टोला तटकरे यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांना लगावला. महाड, पेण, अलिबाग, दापोली या सर्व मतदार संघात युतीचा धर्म पाळून माझ्याकडून पूर्ण ताकदीने काम केले जाईल, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.