अलिबाग- मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामांची सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पहाणी केली. निरनिराळ्या कारणांनी महामार्गाचे काम रखडले असले तरी उर्वरीत कामे लवकर पूर्ण व्हावीत यासाठी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही त्यांनी दिली. मात्र जूनी कामे रखडली असतांनाच आता पेण परिसरात वाशी नाका येथे नविन पूलाचे काम प्रस्तावित केले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. त्यामुळे शंभर कोटींच्या या प्रस्तावित पूलामुळे महामार्गाचे काम अजूनच रखडण्याची शक्यता आहे.
रविंद्र चव्हाण हे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असतांना त्यांनी मुंबई गोवा महामार्गाचे जवळपास दोन डझन पहाणी दौरे केले. मात्र रस्त्याच्या कामाला गती काही मिळाली नाही. आता राज्याच्या नवनियुक्त सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी चव्हाण यांचा आदर्श कायम ठेवत आज पुन्हा एकदा मुंबई गोवा महामार्गाच्या कामाचा पहाणी दौरा केला.
पळस्पे येथून त्यांनी महामार्गाच्या कामाची पहाणी सुरू केली. खारपाडा, पेण, वाशी नाका, नागोठणे, वाकण, कोलाड, इंदापूर, माणगाव येथील कामांचा प्रत्यक्ष पहाणी केली. लोकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. महामार्गाचे कामाला गती देण्याचे निर्देश दिले. पेण जवळील वाशी नाका येथे नवीन पूलाच्या उभारणीसाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत. मात्र नवीन पूलाच्या कामामुळे महामार्गाचे काम अजूनच रखडण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यात इंदापूर आणि माणगाव येथील बाह्य वळण मार्गांची कामे रखडली आहेत. नागोठणे, कोलाड, लोणेरे येथील पूलांची कामे खोळंबली आहेत अशातच आता पेण जवळील वाशी नाका येथे नवीन पूलाचे हाती घेतले जाणार असल्याने महामार्गाच्या कामाला आणखिन उशीर होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत.
महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्यातील कामाला २०१० साली सुरूवात झाली होती. अजून हे काम पूर्ण झाले नाही. भूसंपादनातील अडचणी, पर्यावरण विभागाची मंजूरी, ठेकेदाराची दिवाळखोरी, काही ठेकेदार सोडून गेले यासारख्या विवीध कामांमुळे हे काम रखडत गेले. अजूनही पूलांची आणि बाह्यवळण रस्तांची शिल्लक आहेत. इंदापूर ते कशेडी या दूसऱ्या टप्प्यातील कामांची परिस्थिती फारशी वेगळी नाही. २०१४ साली या टप्प्यातील कामाला सुरवात झाली होती. हे कामही अद्याप शंभर टक्के पूर्ण झाले नाही. कशेडी घाटातील बोगद्याची दुसरी मार्गीका अद्याप सूरू करण्यात आलेली नाही.
गणेशोत्सवापूर्वी जास्तीत जास्त कामे मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी राज्यसरकार आणि केंद्रसरकारच्या यंत्रणा समन्वय राखून काम करत आहेत. महामार्गाच्या कामाला आधीच खूप उशीर झाला आहे. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे खोटी आश्वासने देणार नाही. मे अखेर पर्यंत जेवढी जास्त काम पूर्ण होतील ती पूर्ण केली जातील, जी कामे पूर्ण होऊ शकणार नाही तेथील पर्यायी मार्ग आणि सर्विस मार्गांची पावसाळ्यापूर्वी मार्गी लावली जातील.
शिवेंद्र राजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री