अलिबाग : अलिबाग समुद्र किनारी बेदरकारपणे एटीव्ही चालवून झालेल्या अपघाताची एक चित्रफीत समाज माध्यमांवर व्हायरल झाली होती. यात दोन महिला आणि उंट जखमी झाले होते. समाज माध्यमांवर प्रसारीत झालेल्या या चित्रफीतीची गंभीर दखल पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी घेतली होती. या चित्रफीतीची सत्यता पडताळून संबधितांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. यानंतर अलिबाग पोलीस ठाण्यात एटीव्ही चालक, मालक बापलेकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानुसार अलिबागचे पोलीस निरीक्षक संजय बांगर आणि त्यांचे कर्मचारी समुद्र किनाऱ्यावर दाखल झाले. त्यांनी सदर घटनेची माहिती संकलित केली. यावेळी ही घटना २८ जानेवारी सायंकाळी पावणे पाच वाजेच्या सुमारास घडल्याची माहिती समोर आली. अपघातग्रस्त एटीव्ही बाईक ही दिनेश वसंत कार्लेकर (रा.शास्त्रीनगर) यांची असून त्यांचा अल्पवयीन मुलगा ही एटीव्ही चालवित होता अशी माहिती समोर आली. समुद्र किनाऱ्यावर व्यवसाय करण्यासाठी एटीव्ही चालकांनी पर्यटन संचलनालयाचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. पण दिनेश कार्लेकर यांनी कुठलेही प्रमाणपत्र नसतांना आपल्या अल्पवयीन मुलाला व्यवसायासाठी ही एटीव्ही ताब्यात दिल्याचेही चौकशीत समोर आले.
हेही वाचा : Petrol Diesel Price Today: अर्थसंकल्पापूर्वीच जाहीर झाले पेट्रोल-डिझेलचे नवीन दर, मुंबई-पुण्यात भाव काय?
या माहितीच्या आधारे अलिबाग पोलीसांनी या दोघा बापलेकांविरोधात पर्यटकांच्या जीवितास धोका निर्माण होईल असे कृत्य केल्याबददल तसेच प्राण्यांना क्रुरतेने वागवल्या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार किर्ती म्हात्रे याचा तपास करीत आहेत. दरम्यान समुद्र किनाऱ्यावर अशाच बेकायदा एटीव्ही मोठ्या प्रमाणात चालवल्या जात आहेत. या एटीव्ही राईडमुळे पर्यटकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी याची गंभीर दखल घेत रायगडच्या किनाऱ्यांवर ज्या बेकायदा एटीव्ही चालवल्या जातात त्यांच्यावर कारवाई करावी , अशी मागणी अलिबागकरांनी केली आहे.