अलिबाग : लाडकी बहिण योजना ही सरकारच्या पैशातून मतदारांना दिलेली लाच असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी केला आहे. लाडक्या बहिण योजनेमुळे किती योजनांना कात्री लावावी लागली हे सरकारने स्पष्ट करावे, या योजनेमुळे सामाजिक योजनांना लाडकी बहिण योजनेचा फटका बसला असल्याची टिप्पणी त्यांनी केली. ते अलिबाग येथे पिएनपी चषक क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनानंतर पत्रकारांशी बोलत होते.
गेल्या तीन वर्षापासून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे पैसे मिळालेले नाही. शेतकऱ्यांचे ठिबक सिंचनाचे अनुदान प्राप्त झाले नाही. सामाजिक योजनांना कात्री लावाची आणि सवंग प्रसिध्दी मिळेल अशा योजनांच्या पाठी धावायचे अशात हे सरकार फसले असल्याचा आरोप त्यांनी केला. लाडकी बहिण योजनेसाठी ४६ हजार कोटींचा खर्च केला जात आहे. त्यामुळे आदिवासी, दलित, अल्पसंख्यांक योजनांना या योजनेचा फटका बसला असला असल्याचा आरोपही त्यांनी केला.
संवेदनशील विषयांना हात घालून तरूणांची डोकी भडकवण्याचे काम सध्या सुरू आहे. यातून काही पक्ष स्वतःची राजकीय पोळी भाजून घेत आहेत. या तरुणांचे चळवळींच्या माध्यमातून प्रबोधन करणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरही शेट्टी यांनी यावेळी भाष्य केले. शरद जोशी म्हणायचे नेता तस्कर आणि गुंड अफसर हे सामान्य माणसाचे शत्रु आहेत. आता तशीच परिस्थिती आहे. राजकारण्यांनी गुंडाना संरक्षण द्यायचे, त्यांच्या भानगडींवर पांघरूण घालायचे, यातून अमाप पैसा गोळा करायचा आणि या पैश्यातून पुन्हा सत्ता मिळवायची. सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सत्ता मिळवायचा. यात सामान्य माणूस पिचला जातो. बीड मध्ये सध्या हेच सुरू आहे. ही व्यवस्था उखडून टाकायची असेल तर तरूणांनी या विरोधात रस्त्यावर उतरले पाहीजे असेही ते म्हणाले.
विक्रमी आणि पाशवी बहुमत मिळूनही सरकारला जिल्ह्याचे पालकमंत्री ठरवता येत नाही हे त्यांचे दुर्दैव आहे. त्यामुळे हे बहुमत बेगडी आहे. दोन महिने झाले तरी सरकारला आपली पकड प्रशासनावर बसवता आलेली नाही. अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यापलीकडे सरकारने काहीच केले नाही. त्यामुळे जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. लोकांनी जनतेचा स्वाभिमान विकत घेणाऱ्यापासून सावध रहायला हवे आणि चांगले लोकप्रतिनिधी निवडून द्यायला हवेत असे शेट्टी यांनी यावेळी सांगितले.