अलिबाग : कोकणभूमी प्रतिष्ठान व जंजिरा ऍडव्हेंचर टुरिस्ट ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने राजपुरी खाडीत रंगल्या शिडाच्या बोटींच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीत मुरुड राजपुरी येथील १२ शिडाच्या बोटी सहभागी झाल्या होत्या. शिडाच्या बोटी चालवण्याचे कसब तरुण पिढीत टिकून रहावे, आणि पर्यटक शिडाच्या बोटींकडे आकर्षित व्हावे या उद्देशाने या शिडाच्या बोटींच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. लहान बोटी आणि मोठ्या बोटी अशा दोन गटांत या स्पर्धा पार पडल्या.
हेही वाचा : वंचितबाबत संभ्रम वाढला
छोट्या गटात प्रथम क्रमांक लक्ष्मी बोट, दुसरा क्रमांक सुलतान बोट, तिसरा क्रमांक सुलतानी बोटीने पटकावला. तर मोठ्या गटात प्रथम क्रमांक नूरानी बोट, दुसरा क्रमांक दस्तगीर बोट, तिसरा क्रमांक अकबरी बोटीने पटकावला. त्यांना रोख रक्कम व पारितोषिक देण्यात आले. दरवर्षी स्पर्धेसाठी बोटी चालक जय्यत तयारी करत असतात. आपल्या बोटीचे रंगकामे केली जाते, बोटीचे शीड नवीन किंवा दुरुस्त केले जाते. बोट जेटीवरून सुटल्यावर अगरदांडा जेटीला राउंड मारून पुन्हा राजपुरी जेटीकडे परत येतात. ही स्पर्धा पाहणे हा एक विलक्षण अनुभव असतो. जातांना बोटी अतिशय स्पीडमध्ये जातात, पण येताना शीड हवेप्रमाणे फिरून शिडावर बोटीचा समतोल राखून आणाव्या लागतात. चालकांचे कसब यावेळी पणाला लागते. महाराष्ट्र दिनी अशाच स्पर्धेचे पुन्हा आयोजन करण्याची घोषणा यावेळी कोकणभूमी प्रतिष्ठानच्या संजय यादवराव यांनी केली. स्पर्धेच्या नियोजनात आमदार महेंद्र दळवी, श्रीकांत सुर्वे, प्रकाश सरपाटील, जावेद कारभारी, राजपुरीच्या बोट मालक व नागरिक यांनी मोलाचे योगदान दिले.