अलिबाग : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची तोफ धडाडणार आहे. रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाच्या निमित्ताने हे सर्वजण श्रीवर्धन येथे एकत्र येणार आहेत. यानंतर श्रीवर्धन येथे इंडीया आघाडीच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रातील या कार्यक्रमाला राजकीय स्वरूप प्राप्त झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार पहिल्यांदाच रायगड जिल्ह्यात येत आहेत. त्यामुळे आदिती तटकरे यांच्या मतदारसंघात होणाऱ्या या सभेत ते कोणती भुमिका मांडतात. याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. तीन शिवसेना आमदारांच्या फुटीनंतर उध्दव दुसऱ्यांदा रायगड जिल्ह्यात येत आहेत. त्यामुळे तेही कोणती भुमिका या निमित्ताने मांडणार याची उत्सुकता असणार आहे.
हेही वाचा : Maharashtra News Live : “जयंत पाटील एका घटनेमुळं तिकडं थांबले, ती घटना…”, अजित पवार गटातील मंत्र्यांचं विधान
मागील विधानसभा निवडणूकीतील पराभवानंतर शेकाप काहीसा बॅकफूटला गेलेल्या अवस्थेत होता. राज्यात मागील दोन वर्षांत ज्या राजकीय घडामोडी सुरू होत्या त्याबाबतही शेकापचे आमदार जयंत पाटील बुचकळयात पडलेल्या अवस्थेत होते. शेकापनेते सावध पवित्रा घेत होते. काय भूमिका घ्यायची याबाबत शेकापमध्ये संभ्रमावस्था होती. मात्र २ ऑगस्ट रोजी पाली येथे झालेल्या पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात शेकापने आपली भूमिका स्पष्ट केली. महाविकास आघाडी म्हणजेच इंडिया आघाडी बरोबर राहणार असल्याची घोषणा जयंत पाटील यांनी केली होती. याच पार्श्वभूमीवर आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना तटकरेंच्या बालेकिल्ल्यात आणण्याचा घाट आमदार जयंत पाटलांनी घातला आहे.
हेही वाचा : “हे पाहून वाईट वाटलं”, पंतप्रधानांच्या शरद पवारांवरील टीकेनंतर जितेंद्र आव्हाडांचा अजित पवार गटाला टोला
या कार्यक्रमाच्या निमित्ताने इंडिया आघाडीचे कोकणात प्रथमच शक्तीप्रदर्शन होणार आहे. शेकापसह शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष एकत्रितरित्या आपली ताकद दाखवण्याची शक्यता आहे. मागील विधानसभा निवडणूकीतील शेकापच्या पराभवापासून जयंत पाटील आणि सुनील तटकरे यांच्यातून विस्तव जात नाही, अशी परीस्थिती आहे. परंतु जयंत पाटील हे तटकरे यांच्यावर थेट टीका करणे टाळत होते मात्र त्यांची नाराजी लपून राहिली नव्हती. आगामी काळात जयंत पाटील हे तटकरे यांच्या विरोधात थेट मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : आता ‘विशेष’ मुलांना वर्गखोलीत खाद्यपदार्थ खाण्याची मुभा
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी राज्याच्या अनेक भागात दौरे केले मात्र प्रथमच ते कोकण दौऱ्यावर येत आहेत. यापूर्वी सुनील तटकरे यांनी शरद पवारांना अनेकदा वेगवेगळया कार्यक्रमाच्या निमित्ताने रायगडात आणले होते. परंतु आता शरद पवारांपासून सुनील तटकरे यांनी फारकत घेत अजित पवार यांची साथ केली. त्यामुळे श्रीवर्धन दौऱ्यात शरद पवार काय भूमिका मांडतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.