अलिबाग : रेवस रेड्डी सागरी मार्गावरील दोन मोठ्या पुलांची कामे लवकरच सुरू होणार आहेत, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या पूलांच्या निविदा प्रसिध्द केल्या आहेत. यामुळे चार दशकांपासून रखडलेल्या पुलांच्या कामांना गती मिळणार असून सागरी मार्गही दृष्टीक्षेपात येणार आहे. कोकणातील समुद्र किनाऱ्यांवरील गावे आणि शहरांना जोडणारा एक महामार्ग असावा, ज्यामुळे कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल, यातून रोजगार निर्मिती होईल आणि आर्थिक सुबत्ता वाढेल. मुंबईतून तळ कोकणात जाण्याचे अंतर कमी होईल. हा मार्ग मुंबई गोवा महामार्गाला पर्यायी मार्ग ठरू शकेल. यासाठी बॅरीस्टर ए. आर. अंतुले यांनी १९८० मध्ये रेवस रेड्डी सागरी मार्गाची संकल्पना मांडली होती. मात्र या मार्गावरील मोठ्या पूलांची कामे रखडल्याने हा सागरी मार्ग पुर्णत्वास जाऊ शकला नाही.
आता मात्र या सागरी मार्गावरील पूलांची कामे मार्गी लागणार आहेत. राज्य सरकारने यासंदर्भातली पाऊले टाकण्यास सुरूवात केली आहे. धरमतर आणि आगरदांडा खाड्यांवरील पूलांच्या निविदा महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळाने प्रसिध्द केल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही पुलांची कामे लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. धरमतर खाडीवर रेवस ते करंजा दरम्यान पूलाची उभारणी केली जाणार आहे. या पुलाच्या बांधकामासाठी २ हजार ७९ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. धरमतर खाडीवरील २ किलोमीटर लांबीच्या या पूलाचे कामे तीन वर्षात पूर्ण होणे अपेक्षित आहे. दोन्ही बाजूंच्या जोड मार्गांचाही यात समावेश आहे. या पूलामुळे अलिबाग आणि उरणचे अंतर ३० मिनटांनी कमी होणार आहे.
तर मुरुड आणि श्रीवर्धन तालुक्यांना जोडणाऱ्या आगरदांडा खाडीवरील पुलाची निविदाही प्रसिध्द करण्यात आली आहे. मुरूड तालुक्यातील आगरदांडा ते श्रीवर्धन तालुक्यातील दिघी दरम्यान पूलाची निर्मिती केली जाणार असून यासाठी ८०९ कोटींचा खर्च अपेक्षित आहेत. ३० महिन्यांत पूलाची उभारणी करणे अपेक्षित आहे. यामुळे दोन्ही तालुक्यातील अंतर ४० मिनटांनी कमी होणार आहे. दोन प्रमुख पूलांची कामे मार्गी लागल्याने रायगड हा मुंबईच्या अधिकच जवळ येणार आहे. आधीच अटल सेतूच्या निर्मितीमुळे मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील अंतर पाऊण तासाने कमी झाले आहे. आता सागरी मार्गावरील पुलांची कामे मार्गी लागली तर मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होईलच पण यामुळे जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना मिळेल, आणि प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे.
हेही वाचा : नगरमध्ये मोर्चेकरी वकील चढले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर; फेकल्या पाण्याच्या बाटल्या!
बाणकोट खाडीवरील अर्धवट पुलाचे स्ट्रक्चरल ऑडीट
याच सागरी मार्गावरील रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना जोडणाऱ्या बाणकोट खाडीवरील पूलाचे काम २०१० मध्ये सुरू कऱण्यात आले होते. मात्र हे काम ठेकेदाराच्या कार्यक्षमतेमुळे अर्धवट रखडले. आता या पुलाच्या अर्धवट अवस्थेत असलेल्या सांगाड्याचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात येत आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर जुन्या अधर्वट अवस्थेतील पुलाची बांधणी करावी अथवा नवीन पुलाचे काम करावे याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती एमएसआरडीसीच्या सूत्रांनी दिली आहे.