अलिबाग : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कुणबी नोंद शोधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी जिल्हा पातळी आणि तालुका पातळीवर स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आले आहे. पण या नोंदींचा शोध घेत असताना प्रशासनाची दमछाक होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात पहिल्या दहा दिवसांत जवळपास ३९ हजार नोंदी आढळून आल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठा आरक्षणासंदर्भात कागदोपत्री पुरावे शोधण्याची मोहीम सध्या शासनस्तरावर हाती घेण्यात आली आहे. यासाठी जिल्हास्तरावर एका विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली असून, त्यावर नोडल ऑफीसर म्हणून उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली दहा जणांचे एक पथक ही माहिती संकलीत करण्याचे काम करत आहेत. तर जिल्ह्यातील १५ तालुक्यांत तहसिलदारांच्या नेतृत्वाखाली तालुका स्तरीय पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. शासनस्तरावरील कागदपत्रांची पडताळणी करून कुणबी नोंदी तपासण्याचे काम जोमाने सुरू करण्यात आले आहे.

हेही वाचा : “म्हातारपणात एकाला काहीच सुचत नाही”, मनोज जरांगेंची नेमकी कोणावर टीका? म्हणाले, “आपण कोणाचं नाव…”

पहिल्या दहा दिवसांत शासकीय १७ लाख शासकीय अभिलेख तपासण्यात आले आहेत. ज्यात ३९ हजार अभिलेखांवर कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांनाही कुणबी – मराठा आणि मराठा – कुणबी अशा नोंदी तपासण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे यंत्रणा कामाला लागल्या आहेत. या जुन्या नोंदी शोधतांना यंत्रणांची चांगलीच दमछाक होतांना दिसत आहे.

हेही वाचा : डीएड-बीएड धारकांना संधी! राज्यात आणखी २० हजार शिक्षकांची भरती; लवकरच राबवणार प्रक्रिया

रायगड जिल्ह्यातील नागरिकांनाही या संदर्भातील पुरावे, वंशावळी, शैक्षणिक, महसुली पुरावे, जुने अभिलेख, सनदा, राष्ट्रीय दस्तऐवज प्रशासनाला सादर करण्याचे आवाहन करण्यात आले. २१ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत दोन प्रतींमध्ये यासंदर्भातील काही दस्तऐवज उपलब्ध असल्यास तालुका अथवा जिल्हास्तरीय कक्षात सादर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा : Maharashtra News Live : “होय, माझ्या मागे मोठी शक्ती!” राज ठाकरेंच्या दाव्यावर मनोज जरांगेंचं उत्तर

जुन्या नोंदींचा शोध घेत असताना शाळा व्यवस्थापनांची तारांबळ उडत आहे. कारण शंभर वर्षापुर्वींचे जुने रजिस्टर आणि जनरल रजिस्टरमधील नोंदी शोधण्याचे त्यांचे कुणबी मराठा, मराठा कुणबी आणि कुणबी असे तीन घटकांत वर्गीकरण करून त्यांची नावासह नोंद घेण्यास सांगण्यात आले आहे. ही रजिस्टर जुनी आणि जीर्ण झाली असल्याने त्यातून नोंदी शोधणे अतिशय आव्हानात्मक झाले आहे. हे काम करताना जीर्ण झालेली पाने फाटण्याची शक्यता आहे.