निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात प्रमुख उमेदवारांची विधानसभा मतदारसंघनिहाय स्थिती काय राहील, याची चर्चा सुरू झाली असून राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आपल्या हक्काच्या मतदारसंघांमध्येच पिछेहाट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी कुणबी-मराठा आणि मुस्लिम मते निर्णायक भूमिका बजावतील, असे चित्र आहे.
अमरावती लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी अमरावती, मेळघाट आणि तिवसा हे तीन मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात आहेत. दर्यापूर मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजीत अडसूळ प्रतिनिधित्व करीत आहेत. बडनेरा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवार नवनीत राणा यांचे पती रवी राणा यांनी अपक्ष उमेदवार म्हणून बाजी मारली होती. विविध कारणांमुळे या मतदारसंघांमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांना मते मागण्यासाठीही संघर्ष करावा लागला आहे. प्रस्थापित विरोधी घटकाचा प्रभाव या ठिकाणी जाणवत असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. मेळघाट मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार केवलराम काळे हे रवी राणा यांच्यासोबत दिसत असले, तरी त्यांचे समर्थक राणा यांना कितपत स्वीकारतात, यावर मेळघाटचे चित्र अवलंबून आहे. भाजपचे माजी आमदार राजकुमार पटेल यांनी ऐनवेळी नवनीत राणा यांचा प्रचार सुरू केल्यानंतर भाजपने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. राजकुमार पटेल यांच्या समर्थनाचा किती फायदा नवनीत राणा यांना मिळू शकतो, याचे आडाखे बांधले जात आहेत.
अमरावतीत काँग्रेसचे आमदार रावसाहेब शेखावत आणि त्यांचे कट्टर विरोधक माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख हे एकाच मंचावरून नवनीत राणा यांचा प्रचार करतानाचे चित्र अमरावतीकरांना दिसले, हा भ्रम की सत्य, या संभ्रमावस्थेत मतदार असतानाच आमदार रवी राणा आणि रावसाहेब शेखावत यांच्यातील संघर्ष शेखावत समर्थक विसरले असतील काय, हा प्रश्न सध्या चर्चेत आला आहे. बडनेरा मतदारसंघात खुद्द रवी राणा यांनाच प्रचार करताना अडचणी आल्या आहेत. त्यांना स्थानिक प्रश्नांवर लोकांनी भंडावून सोडले आहे. त्यातच राष्ट्रवादीतून निष्कासित करण्यात आलेल्या संजय खोडके यांच्या प्रखर विरोधाचा त्यांना सामना करावा लागत आहे. संजय खोडके यांनी आपली शक्ती बसपचे उमेदवार गुणवंत देवपारे यांच्या पाठीशी उभी केली आहे. देवपारेंना मिळणाऱ्या मतांच्या माध्यमातून खोडके यांना अमरावती जिल्ह्य़ातील आपली ताकद दाखवून देण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यांनी नवनीत राणा यांच्याविरोधात टोकाची भूमिका घेतल्याने राणा यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
अचलपूरचे आमदार आणि प्रहारचे संस्थापक बच्चू कडू यांनी रिपाइंचे डॉ. राजेंद्र गवई यांना पाठिंबा दिला आहे. येत्या विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून त्यांच्या भूमिकेकडे पाहिले जात असले, तरी मराठा-कुणबी समाजातील त्यांचे समर्थक कोणता निर्णय घेतात, यावर बरेचसे चित्र अवलंबून राहणार आहे. तिवसाच्या आमदार यशोमती ठाकूर या रवी राणा यांच्या प्रचारात गुंतलेल्या आहेत. मात्र, या भागातून राणा यांना कितपत प्रतिसाद मिळतो, याचे औत्सूक्य आहे. अमरावतीत या निवडणुकीत मराठा-कुणबी मतांचे धृवीकरण झाल्यास ते कुणाच्या पथ्यावर पडणार हा मुख्य विषय चर्चेत आला आहे. दुसरीकडे मुस्लिम मते मिळवण्यासाठी राष्ट्रवादी आणि बसप यांच्यात चढाओढ पहायला मिळाली आहे.