जालना : मोबाईल फोन पाटाच्या पाण्यात टाकून दिल्याच्या रागातून एका साडे तेरा वर्षीय बालकाने ४१ वर्षीय महिलेचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना पोलीस तपासात समोर आली.
या घटनेची माहिती मंगळवारी (दि. १ एप्रिल) जालना पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली. मीराबाई उर्फ संध्या राजाभाऊ बोंडारे, असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. मीराबाई या घनसावंगी तालुक्यातील आंतरवाली टेंभी येथील रहिवासी. त्यांचा २५ मार्च रोजी शेतातच मृतदेह आढळून आला. याप्रकरणी मीराबाईंचा भाऊ अंकुश सदाशिव आैटे (रा. आपेगाव, ता. पैठण) यांनी दिलेल्या तक्रारीवरून तीर्थपुरी पोलीस ठाण्यात सुरुवातीला अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास केला असता काही पुराव्याच्या आधारे पोलिसांना एका विधिसंघर्षग्रस्त बालकाने मीराबाईचा खून केल्याचे धागेदाेरे मिळाले. त्या बालकास ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पकडण्यात आलेल्या विधिसंघर्षग्रस्त बालकाच्या शेतात जाणारे पाटाचे पाणी वारंवार अडवणे व बालकाचा मोबाईल फोन पाण्यात टाकूून खराब केल्याचा राग मनात धरून २५ मार्च रोजी दुपारी ३ च्या सुमारास डोक्यात मीराबाईं झोपल्या असताना डोक्यात दगड घालून खून केल्याचे पोलिसांना सांगितले, अशी माहिती देण्यात आली. पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तीर्थपुरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक साजीद अहमद, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, उपनिरीक्षक राजेंद्र वाघ आदींच्या पथकाने तपास पूर्ण केला.