यंदा देहू येथील तुकाराम बीज कोणत्याही परिस्थितीत वारकरी सांप्रदाय साजरी करणारच, यासाठी आमच्यावर काही गुन्हे दाखल झाले तरी या गुन्ह्यांना सामोरे जायची आमची तयारी आहे. असे बंडातात्या कराडकर यांनी  आज (रविवार) सातारा येथे सांगितले.

करोनाचा संसर्ग वाढत असल्याचे भासविले जात आहे. पुणे जिल्ह्याची लोकसंख्या काही लाखांमध्ये असताना तिथे तीन साडेतीन हजार रुग्ण आढळून आले म्हणजे सर्वांना करोना झाला आहे असं नाही. देहू आणि आळंदी येथे तर करोनाचे रुग्णच नाहीत. सगळी थिएटर,ढाबे, लग्न सुरू  मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. मग वारकरी सांप्रदायातील यात्रा, उत्सव व वारीला प्रतिबंध करून, ते बंद पाडण्याचा उद्योग प्रशासनातील काही लोकांकडून सुरू आहे. आषाढी, माघी, चैत्र वारी या सर्वांवर निर्बंध आणले गेले आहेत.

करोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी मंदिरं, यात्रा, सार्वजनिक कार्यक्रम सरकारने बंद केले होते. यावर्षी देखील हीच परिस्थिती दिसत असून वारकऱ्यांनी कोणतीच यात्रा करु नये असा याचा अर्थ होतोय. मात्र यंदाची ३० मार्चला होणारी देहू येथील तुकाराम बीज कोणत्याही परिस्थितीत वारकरी सांप्रदाय साजरी करणार असल्याच्या इशारा बंडातात्या कराडकर यांनी सरकारला दिला आहे.

देहू येथील तुकाराम बीज कार्यक्रमावर मर्यादित लोकांच्या उपस्थितीचे बंधन घालावे. दहा हजार पेक्षा जास्त लोक येणार नाहीत याची काळजी आम्ही घेऊ. नाथ षष्ठीच्या दिवशी पैठणमध्ये शुकशुकाट असणं बरोबर नाही. त्यामुळे नाथषष्टी ही आम्ही मर्यादीत लोकांच्या उपस्थितीत करणार आहोत. करोनाचं कारण सांगून मंदिरे उत्सव बंद केले जात आहेत हे असेच चालू राहिले तर दुसऱ्यांदा आषाढी वारी व ज्ञानोबांच्या जयजयकार होणार नाही, याला कुठेतरी पायबंद घातला पाहिजे म्हणून आम्ही ३० मार्चला होणारी तुकाराम बीज साजरी करणारच आहोत.

करोना वाढत असल्याचे भासविले जात आहे. लोकांच्या मनात दहशत निर्माण केली जात आहे. किरकोळ सर्दी-पडसे असणाऱ्या लोकांनाही करोना झाल्याचे सांगून हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या लोकांना झालेल्या आजारावर या क्षेत्रातील काहींनी मोठा धंदा केला आहे. यातून लोकांच्या मनात दहशत व घबराहट निर्माण केली गेली आहे. सरकारने धार्मिक उत्सव ,मंदिरं सुरू करायला हवीत. यामुळे लोकांच्या मनातील भीती कमी होईल. अध्यात्मातून माणसाला मोठी शक्ती मिळते. त्यांच्या मनात आजाराविरोधात लढण्याची तीव्र मानसिकता, ताकद आपोआप तयार होते. सध्या बंद बंद करून माणसांची सकारात्मक मानसिकताही बंद करायचे काम सुरू आहे.  तुकाराम बीज आणि नंतर येणारी पैठण येथील नाथषष्ठी यात्रा आम्ही साजरी करणारच आहोत.

 

Story img Loader