करोना विषाणुचा प्रादुर्भाव राज्यात दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. मुंबई, पुणे पाठोपाठ औरंगाबाद जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या गेल्या काही दिवसांमध्ये झपाट्याने वाढली आहे व दररोज रुग्ण संख्येत अधिकच भर पडत आहे. आज औरंगाबाद जिल्ह्यात आज 41 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या आता 1 हजार 117 वर पोहचली आहे. जिल्हा प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आलेली आहे.

आज आढळलेल्या रुग्णांमध्ये 16 महिला व 25 पुरुषांचा समावेश आहे. तर, गणेश नगर, सातारा गाव खंडोबा मंदिर, न्यायनगर, पुंडलिक नगर, पोलीस कॉलनी, लिमयेवाडी, मित्र नगर, शरीफ कॉलनी, मुकुंदवाडी, रोहीदास नगर, उस्मानपुरा, कैलासनगर, जुना मोंढा, भवानी नगर, शिवशंकर कॉलनी, बालाजी नगर, इंदिरानगर, खडकेश्वर, माणिक नगर, जयभीम नगर, संजय नगर, सिटी चौक, जिल्हा सामान्य रुग्णालय, आझम कॉलनी या शहरांमधील भागांसह फुलंब्री तालुक्यातील बाबारा भिवसने वस्ती व कन्नड तालुक्यातील धनगरवाडी, औराळा या भागांमधील रुग्णांचा समावेश आहे.

मराठवाडय़ातील करोनाबाधितांची संख्या आता वाढू लागली आहे. मुंबई आणि पुण्याहून आलेल्या रुग्णांमुळे बीड, परभणी जिल्ह्य़ांत विषाणू पोहोचला आहे. औरंगाबाद शहरातील करोनाबाधितांची संख्या एक हजाराहून अधिक झाली आहे. आतापर्यंत मराठवाडय़ात करोनाने ४० जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या असणाऱ्या औरंगाबाद शहरातील सर्व रुग्ण एकमेकांच्या संपर्कातील असल्याचे दिसून आले आहे. शहरातील प्रतिबंधित क्षेत्रात महसूल अधिकारी आणि कर्मचारी  गस्त घालत आहेत. बाहेरून सीमा सील केल्या असल्या तरी आतमध्ये नागरिक संपर्क ठेवत असल्याने प्रशासनही हैराण आहे. औरंगाबाद शहरातील करोना रुग्णांची व मृत्यूची संख्या लक्षात घेता वयोवृद्धांची तपासणी केली जाणार असल्याचे महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.

Story img Loader