सगळीकडे उत्साहाने गणपती-गौरीचे आगमन झाले आहे..गौरी-गणपती असो, वा सत्यनारायण पूजा, अशा कोणत्याही शुभकार्यात विधवा महिलांचा थेट सहभाग अजूनही तसा स्वीकारला जात नाही. परंतु अशा धार्मिक अनिष्ठ रूढी-परंपरांना छेद देत एका विधवा महिलेने गौरी-गणपतीचे घरात स्वागत केले. धार्मिक विधींसह गौरीचा सगळा पाहुणचार केला. बार्शी शहरात समाजाने सकारात्मक नोंद घ्यावी अशी घटना घडली.
यासंदर्भात विनया महेश निंबाळकर सांगत होत्या. त्यांच्याच प्रेमळ आग्रहाने त्यांच्या विधवा आईने घरातील गौरी-गणपतीची यथासांग धार्मिक विधी करून प्रतिष्ठापना केली. बार्शी व परिसरात त्याची कौतुकाने चर्चा होत आहे.
बार्शी तालुक्यातील कोरफळे येथे पती महेश निंबाळकर यांच्या सोबत भटक्या विमुक्त व अनाथ मुला-मुलींसाठी निवासी शाळा चालविणा-या विनया निंबाळकर यांचे माहेर बार्शी. गौरी-गणपतीसाठी त्या माहेरी गेल्या. तत्पूर्वी, आईने गौरी-गणपतीची सारी तयारी करून ठेवली होती. घरासमोर अंगणात सुंदर रांगोळी काढताना आईचा प्रसन्न चेहरा नजरेस पडला. स्वाभाविकच तिचा उत्साह लपून राहिला नव्हता. १०-१५ मिनिटांच्या विश्रांतीनंतर आम्ही दोघीनं संयुक्तपणे सूत्रे हाती घेतली. तोच आमच्या कॉलनीतील छोटा मुलगा धापा टाकत घरी आला. त्यानं वर्दी दिली, ‘काकू (आईला) तुम्हांला आईने हळदी-कुंकुवाला बोलवंय’ त्याचं वाक्य ऐकुन आई हो म्हणून शांत बसली. पण मला तिच्या मनात काय विचार चालले आहेत हे समजून आले. विनिता निंबाळकर पुढे सांगत होत्या.
त्या छोट्या मुलाला काय माहित कोणाला सांगायचं..? अन् कोणाला नाही..? मीही त्या क्षणी गप्प बसणं पसंत केले. थोड्या वेळानं मी आईला सांगितलं की, तू पण नवीन साडी नेसून घे. पण का..? ती उत्तरली. मला काय करायचंय ग..? तिची घालमेल लक्षात येत होती. मी मात्र तिला मुद्दामहून साडी नेसण्यास सांगितले. एव्हाना, आमची सगळी तयारी झाली होती, आता लक्ष्मीची पूजा करून तिला घरात आणायचं बाकी होतं. दारातल्या तुळशीसमोर लक्ष्मी आणून ठेवल्या, तोच मी आईला म्हणाले, ‘आज तू पूजा करून लक्ष्मी घरात आणायची..जसे मी करीत होते, त्याच प्रमाणे तुसुद्धा करणार आहेस..’
आई माझ्याकडे एकटक बघून म्हणाली, मी करणार नाही, मला ते रुजू नाही, मी एक ‘विधवा’ आहे. त्यामुळे मला परवानगी नाही, असे तिने ठामपणे सांगितले. पण मीही मनात ठाम विचार केला होता की आज तिलाच सगळं करायला लावायचं. मी तिला समजून सांगायला सुरुवात केली…हे बघ एक स्त्री लग्नाच्या अगोदर सर्व काही पुजाअर्चा करतेच की..! मग नंतर तरच एवढा काय फरक पडतो गं…लग्न झाल्यावर तिचं अस्तित्व नवर्यासोबत का धरले जाते? स्त्री ही एक स्वतंत्र व्यक्ती आहे हे ना….म्हणजे स्त्रीला गृहीत धरत विधवेचं जीणं लादून सार्या गोष्टीपासून वंचित ठेवायचं..? ही कसली प्रथा नी परंपरा..! नवर्याचं निधन झालं की पत्नीच्याही अस्तित्वाचं निधन होतं…मात्र पत्नीच्या मृत्युपश्चात नवरा अस्तित्व मात्र कायम टिकून असतं….जैसे थै..! मग स्त्रीला अशी अडगळ का? तिनं हे करायचे नाही, ते करायचे नाही…आम्ही विधवा आहोत. त्यामूळे आम्हांला हळदीकुंकू किंवा अशा सणासुदीला सहभाग घेण्याची परवानगी नाही…अशी प्रत्येक विधवा सांगत असते…त्याप्रमाणे आईने पण मला सांगायला सुरुवात केली. मग मी तिला सांगितले, मला या गोष्टींचा फरक पडत नाही, माझ्यासाठी तुही एक लक्ष्मीच आहे आणि अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितलं की, तू रोज देवाची पूजा करतेच की..! त्याला चालते ना तू रोज हळदीकुंकु लावलेले, मग आज का चालत नाही…आज सुद्धा तशीच पूजा करायची आहे…आई निरुत्तर झाली आणि शेवटी तिनेच सगळी पूजा केली. अशातर्हेने माझी इच्छा पूर्ण झाली, असे आनंदाने नमूद करताना विनया निंबाळकर यांच्या हस-या चेहऱ्यावर नव्या पिढीला बरेचसे सांगण्यासारखे भाव दिसत होते.