नंदुरबार : इयत्ता दहावी, बारावी परीक्षांमध्ये ज्या विषयात विद्यार्थी नापास होईल, त्या शिक्षकाची पगारवाढ बंद करण्याचे संकेत आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांसंदर्भात राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिले आहेत. आश्रमशाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी विद्यार्थ्यांच्या तिमाही परीक्षांसह शिक्षकांचीही तिमाही चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांचा दर्जा सुधारावा, यासाठी सध्या आश्रमशाळा आणि वसतिगृहाच्या बांधकामासाठी कोटय़वधींचा निधी देण्यात आला आहे. यातून अनेक प्रकल्पातील आश्रमशाळा आणि वसतिगृहांचा कायापालट होत असताना दुसरीकडे आश्रमशाळांमधील शैक्षणिक दर्जाबाबत चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे आता याबाबत कठोर पावले उचलले जात आहेत. आश्रमशाळेतील मुले पहिलीपासून दहावीपर्यंत आश्रमशाळेतच राहत असताना ते नापास होतातच कसे, असा प्रश्न उपस्थित करून या मुलांना कमीतकमी ७५ टक्के गुण मिळायला हवेत, असे गावित म्हणाले.

विभागाच्या अखत्यारीतील अनुदानित आणि नामांकित शाळांमध्ये नववीत जितकी मुले असल्याचे दाखवून अनुदान घेतले जाते. प्रत्यक्षात दहावीत तितकी मुले परीक्षेला बसतच नसल्याचे निदर्शनास आले आहे. नववीतील संख्येप्रमाणे मुले जर दहावीच्या परीक्षेला बसली नाहीत, तर तफावतीतील दहा वर्षांच्या अनुदानाची रक्कम संबंधितांकडून वसूल केली जाईल, असे डॉ. गावित यांनी सांगितले. डॉ. गावित यांच्या हस्ते भालेर, वाघाळे आणि लोय येथे मुलांचे वसतिगृह आणि आश्रमशाळेचे लोकार्पण झाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In case of failure of 10th and 12th students salary increment is stopped vijaykumar gavit ysh