छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथील पुंडलिकनगरात सुरू असलेल्या अवैध गर्भलिंग निदान केंद्रावर महानगर पालिकेच्या पथकाने छापा मारल्यानंतर या प्रकरणाचे धागेदोरे सिल्लोडपर्यंत पोहोचल्याचे प्रशासन, आरोग्य व पोलीस विभागाच्या कारवाईत स्पष्ट झाले. यामध्ये अवैध गर्भपात करून झाल्यानंतर मृत अर्भकाला सिल्लोडजवळील शेतात पुरून ठेवल्याचे उघडकीस आले.
याप्रकरणात सतीश टेहरे, साक्षी सोमीनाथ थोरात, सविता सोमीनाथ थोरात, डॉ. रोशन काशिनाथ ढाकरे (रा सिल्लोड), गोपाळ विश्वनाथ कळंत्रे, नारायण आण्णा पंडित, अशी आरोपींची नावे आहेत. महानगरपालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्या पथकाने पुंडलिकनगरमधील देवगिरी अपार्टमेंट येथे अवैध गर्भलिंग निदान होत असल्याच्या माहितीवरून छापा मारला. पुंडलिकनगर ठाण्यात त्यासंदर्भाने गुन्हा दाखल केला. त्या अंतर्गत सतीश टेहरे याला अटक केली.
हेही वाचा…धार्मिक तेढ निर्माण करणारे भाषण; देवेंद्र कोठेंविरूध्द अखेर गुन्हा दाखल
टेहरे याने कबुली जबाबात दिलेल्या माहितीनुसार तो साक्षी थोरात व सविता थोरात यांना रुग्ण पुरवतो. साक्षी थोरातने गर्भलिंग निदान केल्यानंतर सिल्लोडमधील श्री हॉस्पिटलचे डॉ. रोशन ढाकरे यांच्याकडे पाठवायचे. डॉ. ढाकरे हा त्याच्या दवाखान्यात अवैध गर्भपात करून परिचारक (कंपांउंडर) गोपाळ कळंत्रे व नारायण पंडित यांच्यामार्फत विल्हेवाट लावायचे. या माहितीवरून जिल्हा शल्यचिकित्सकांच्या सहकार्याने व पोलीस उपायुक्त – २ च्या आदेशाने पोलिसांनी डॉ. ढाकरे याच्या सिल्लोडच्या दवाखान्यात छापा मारला. डॉ. ढाकरेसह त्याचे गोपाळ कळंत्रे व नारायण पंडित यांना ताब्यात घेतले. नायब तहसीलदार गवळी यांच्या समक्ष नारायण पंडित याने त्याच्या शेतात पुरून ठेवलेले अवशेष काढून दिले, अशी माहिती पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेश यादव यांनी कळवली.