डहाणू : तलासरी पोलीस स्टेशन हद्दीतील आच्छाड तपासणी नाका येथे रात्रीच्या वेळी काही लोक सामाजिक संस्थेच्या नावाखाली वाहनांना रिफ्लेक्टर स्टिकर लावून देण्याच्या नावाने जबरी वसुली करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांचा तपासणी नाका असताना याठिकाणी जबरी वसुली सुरू असल्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर एका संस्थेमार्फत वाहनांना रिफ्लेक्टर स्टिकर लावून देण्याच्या नावाखाली ट्रक चालकांना दमदाटी आणि कायद्याचा धाक दाखवून जबरी वसुली केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सामाजिक संस्थेच्या नावाखाली बोगस परवानग्या दाखवून ही वसुली केली जात असून या टोळ्यांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही. महामार्गावर रात्रीच्या सुमारास १० ते १२ लोकांची एक टोळी कार्यरत असून आच्छाड, दापचरी तपासणी नाका आणि चारोटी टोल परिसरात हे लोक रात्रीच्या सुमारास कार्यरत होतात. वाहनांना रिफ्लेक्टर स्टिकर लावणे कायद्याने बंधनकारक असल्याचे सांगून आम्हाला शासनाने परवानगी दिली आहे असे सांगून जबरदस्तीने स्टिकर लावून देण्याच्या नावाखाली वाहन चालकांकडून प्रत्येकी २०० ते ५०० रुपये जबरदस्तीने वसूल करतात.
हेही वाचा : “पुन्हा येईनचा व्हिडीओ डिलीट करणं हे पुन्हा येणार नसल्याचे संकेत”, काँग्रेसचा देवेंद्र फडणवीसांना टोला
टोळीकडून आपल्याकडे स्टिकर लावून देण्याची परवानगी असल्याचा दावा करण्यात येत असून पालघर पोलीस अधीक्षकांच्या सहीचे एक पत्र दाखवण्यात येते. या पत्रावर नमूद केल्या प्रमाणे प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीत यांना वाहनांना स्टिकर लावण्याची परवानगी देण्यात आली असून पोलीस स्टेशन मार्फत दोन पोलीस कर्मचारी देण्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच स्टिकर लावण्यासाठी जबरदस्ती करू नये असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. मात्र टोळीकडून वाहनचालकांवर जबरदस्तीने स्टिकर लावून पैसे उकळण्यात येत आहेत. वाहनचालकांना वेळेवर नियोजित ठिकाणी पोहचावे लागत असल्यामुळे ते नाहक त्रासाला कंटाळून यांना पैसे देत आहेत. यावर पोलीस अथवा संबंधित प्रशासनाकडून आवश्यक कारवाई करण्याची गरज जाणकारांकडून व्यक्त होत आहे.
हेही वाचा : थंडीची चाहूल लागताच राज्यात विजेची मागणी घसरली; कोराडी प्रकल्पात सर्वाधिक वीज निर्मिती
“याविषयी पोलिसांना कल्पना नाही. रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग यंत्रणा कार्यान्वित आहे. मात्र आमच्या निदर्शनास अजूनपर्यंत असा कोणताही प्रकार आलेला नाही. तरीदेखील आम्ही याविषयी अधिक चौकशी करून असे प्रकार करताना कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू” – विजय मुतडक, तलासरी पोलीस स्टेशन प्रभारी
“याविषयी तलासरी पोलिसांना चौकशीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महामार्गावर असे काही प्रकार दिसून आल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत” – संजीव पिंपळे, उपविभागीय पोलिस अधिकारी डहाणू
हेही वाचा : “कृषिमंत्री असताना काय केले?” पंतप्रधान मोदींच्या विधानाला शरद पवार प्रत्युत्तर देत म्हणाले…
महामार्गावर वाहने अडवण्याचा अधिकार वर्दीतील पोलिसांशिवाय इतर कोणालाही नाही. स्टिकर लावणे जरी बंधनकारक असेल आणि त्यांना अधिकार प्रदान करण्यात आले असेल तरी देखील महामार्गावर कोणत्याही वाहने अडवता येत नाहीत. स्टिकर विक्रेत्यांनी महामार्गाच्या शेजारी दुकाने लावून स्टिकर लावणे अपेक्षित असताना त्यांच्याकडून वाहनचालकांवर जबरदस्ती करण्यात येत असल्याचे आढळून येत आहे. शिवाय पोलीस यंत्रणांनी अश्या कोणत्याही प्रकारच्या परवानग्या दिलेल्या नसल्याचे सांगण्यात येत असल्यामुळे महामार्गावर कार्यरत टोळ्या वाहनचालकांची फसवणूक करून दमदाटी करत वाहनचालकांची लूट करत असल्याचे दिसून येत आहे.