दापोली : दापोली तालुक्यातील अडखळ तरीबंदर येथे वाहन लावण्याच्या कारणावरुन दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. याठिकाणी दोन गट आमने सामने आल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. रत्नागिरी पोलिसांची दंगल प्रतिबंधक तुकडी याठिकाणी तैनात करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत असून रात्री उशिरा पर्यत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

अडखळ तरीबंदर येथे दोन गटाच्या लोकांमध्ये सायंकाळी जोरदार हाणामारी पाहायला मिळाली. याचे पर्यावसान जोरदार दंगलीमध्ये झाल्याने पाजपंढरी येथील जमाव मोठ्या प्रमाणात अडखळ मोहल्ला येथे घुसला. त्यांनी मोडल्यावर दगड, काठ्या, लोखंडी शिगा यांनी मारा केला. यामध्ये अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी गाव घेऊन दोन्ही गटांना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र रात्रीपर्यंत परिसरात तणावाचे वातावरण होते. रात्री उशिरा आठ जखमींना दापोली उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

या मारहाणीची माहिती दापोली पोलीस स्टेशनला दिल्यानंतर दापोलीचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे आपल्या पोलीस फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल होवून त्यांनी जमावाला पांगवले. यासंदर्भातील दोन्हीही गटातील लोकांच्या तक्रारी घेण्याचे काम रात्री उशिरा पर्यत सुरु होते. जखमींना उपचारासाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आली. रत्नागिरी येथून दंगल प्रतिबंधक जादा पोलीस दल दापोलीत पाठवण्यात आले आहे. तसेच जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी अडखळ येथे जावून परिस्थितीची पहाणी केली. सध्या या ठिकाणी तणाव पुर्ण शांतता असून रात्री या दोन्ही गटाच्या शांतता समितीची बैठक घेण्यात आली.

Story img Loader