धाराशिव जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघापैकी तीन मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेला तर एक मतदारसंघ काँग्रेसकडे राहणार आहे. त्यामुळे आघाडीत मोठ्या पवारांच्या तुतारीला धाराशिव जिल्ह्यातील एकाही मतदारसंघात अधिकृत स्थान मिळालेले नाही. उमेदवाराच्या नावात बदल झाल्यामुळे निर्माण झालेला संभ्रम शिवसेनेने दूर केला आहे. परंड्यात मशाल चिन्हावर माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे पुत्र रणजित पाटील लढणार आहेत. तर माजी आमदार राहुल मोटे यांनी तुतारी चिन्हावर लढण्यासाठी पक्षाच्या अधिकृत एबी फॉर्मसह शुक्रवारी उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे परंड्यात आघाडीत बिघाडी होणार का? हे पहावे लागणार आहे.

धाराशिव जिल्ह्यात एकूण चार विधानसभा मतदारसंघ आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत आघाडीला एकाही मतदारसंघात विजय मिळविता आला नाही. चारपैकी तुळजापुरात भाजपाचे कमळ विजयी झाले. तर उर्वरित तीन विधानसभा मतदारसंघात धनुष्यबाणाला मतदारांनी विजयी कौल दिला. भूम-परंडा-वाशी, धाराशिव-कळंब आणि उमरगा-लोहारा या तीन विधानसभा मतदारसंघात अनुक्रमे प्रा. डॉ. तानाजी सावंत, कैलास पाटील आणि ज्ञानराज चौगुले विजयी झाले. गुवाहाटीमार्गे झालेल्या सत्ता स्थापनेच्या प्रयोगात भूम-परंडा-वाशी आणि उमरगा-लोहारा येथून धनुष्यबाणावर निवडून आलेले दोन्ही आमदार शिंदे सेनेत दाखल झाले. त्यातील भूम-परंडा-वाशी मतदारसंघात सावंत यांच्या या भूमिकेमुळे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी ठाकरेसेनेत राहणेच पसंत केले. सावंत यांनी मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल मोटे यांचा पराभव केला होता. त्यामुळे या मतदारसंघातून पुन्हा एकदा लढण्यासाठी राहुल मोटे तयारीला लागले होते.

हे ही वाचा… Maharashtra Assembly Election 2024 Live : ‘राज ठाकरेंनी श्रीकांत शिंदेंसाठी सभा घेतली, पण माझ्याविरोधात…’, अमित ठाकरेंचं सूचक विधान

मागील काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन झाले. त्यांचे चिरंजीव रणजित पाटील यांना उमेदवारी दिल्यास ठाकरेंसोबत झालेली गद्दारी गाढून टाकता येईल, असे सांगत रणजित पाटील यांच्या उमेदवारीसाठी शिवसैनिकांनी थेट मातोश्री गाठली. मातोश्रीवरून रणजित पाटील यांच्या नावावर मोहोर उमटविण्यात आली. मात्र दुसर्‍या दिवशी शिवसेनेच्या मुखपत्रातून जाहीर झालेल्या उमेदवारांच्या यादीत रणजित पाटील यांचे नाव नसल्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. त्यावर कोणीही प्रतिक्रिया देवू नका. संयम राखा, असे आवाहन करीत राहुल मोटे यांनी आपण उमेदवार असल्याचे सूचक संकेत दिले होते. झालेली चूक दुरूस्त करत शिवसेनेने उमेदवार म्हणून रणजित पाटील यांची गुरूवारी अधिकृत घोषणा केली. तर शुक्रवारी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे इच्छूक उमेदवार राहुल मोटे यांनी एबी फॉर्मसह तुतारी चिन्हावर निवडणूक लढविण्यासठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिंदेसेनेचे शिलेदार तथा राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या दोन्ही घटक पक्षांनी उमेदवारी दाखल केल्यामुळे परंडा मतदारसंघात मोठा संशय कल्लोळ उसळला आहे. ही आघाडीत बिघाडी तर नाही ना? अशी चर्चा जोर धरू लगली आहे. ठाकरेंची मशाल आणि मोठ्या पवारांची तुतारी एकमेकांच्या विरोधात षड्डू ठोकणार का, हे लवकरच स्पष्ट होईल.